“सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास”या संकल्पनेतून गडचिरोलीचा विकास – आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उइके

0
16

स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

गडचिरोली,दि.15: भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथील मुख्य कार्यक्रमासाठी आदिवासी विकास मंत्री, डॉ.अशोक उइके उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. त्यांनी जिल्हयातील उपस्थित ज्येष्ठ नागरिक, सर्व पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार, विद्यार्थी आणि इतर सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळयास जि.प.अध्यक्षा योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, नगराध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, तसेच यावेळी इतर पदाधिकारी व अधिकारी, नागरीक उपस्थित होते.

यावेळी मंत्री महोदयांनी जनतेला उद्देशून भाषण केले. तसेच स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या देशभक्तांना आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सीमा रेषेवर प्राणांचे बलिदान देणा-या सैनिकांना तसेच नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांना त्यांनी यावेळी श्रध्दांजली अर्पण केली.ते यावेळी म्हणाले की आपल्या देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  “सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास” या प्रेरणेतून शासनाकडून जिल्हयातविकासाला गती देण्याचं काम केलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गेल्या काही वर्षात गडचिरेलीमध्ये अमुलाग्र बदल झालेले आहेत.

यावेळी  जिल्हयातील विविध विकास कामांची माहिती त्यांनी जनतेसमोर ठेवली. गडचिरोली जिल्हयातील 35,331 शेतक-यांना 100 कोटी 19 लक्ष रूपयांची कर्ज माफी करण्यात आली आहे. जिल्हयातील शेतीविषयक उत्पन्नात वाढ करण्यासाठी कर्ज स्वरूपात 20,059 शेतक-यांना 84 कोटी 28 लक्ष कर्ज वाटप करण्यात आले आहे. याकरीता त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह व सर्व प्रशासनाचे अभिनंदन केले.

जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने आजपर्यंत केलेल्या उल्लेखनिय कामांचे कौतुकही त्यांनी यावेळी केले. जिल्हयाचे पालकमंत्री, तथा वित्त मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून जिल्हयात विकास कामांना गती मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शबरी घरकुल येाजनेतून 2015-16 पासून आजरोजीपर्यंत  948 घरकुलांचा लाभ देण्यात आला. आदिम जमाती घरकुल योजनेतून आजरोजीपर्यंत 300 घरकुलांचा लाभ देण्यात आला. आता आदिम जमाती घरकुल योजनेचा लक्षांक 500 करण्यात आला आहे. 1992 साली सुकथनकर समितीने आदिवासी विकासाकरीता 9 टक्के राज्याच्या अर्थ संकल्पात तरतूद द्यावी अशी शिफारस केली. 2014 ला मा.मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 9 टक्के निधी आदिवासी विकासा करीता देण्यास सुरूवात झाली. तसेच पेसा अंतर्गत येणा-या ग्रामपंचायतींना 5 टक्के निधी देण्यात येत आहे आणि हा भारतातील पहिला निर्णय ठरला आहे.  यामेध्ये जिल्हयाचे पालकमंत्री, तथा वित्त मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा खुप मोठा वाटा आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास तो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय स्वंयम् योजना सुरू केली.  पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानातून पात्र लाभार्थ्यांची निवड करुन त्यांना अंत्योदय अन्न योजनेत समाविष्ट करण्याकरीता 15 जुलै ते 14 ऑगस्ट या कालावधीत अभियान राबविण्यात आले. 100 टक्के शिधापत्रिका वाटप, 100 टक्के धान्य वाटप तसेच प्रत्येक कुटुंबास 100 टक्के गॅस जोडणी वाटपाबाबतचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे.

अशा प्रकारे सबका साथ, सबका विकास या  भूमिकेतून  शासन काम करीत आहे.  विकासाचा केंद्रबिंदू हा शेवटचा माणूस, आपला आम आदमी राहीलेला आहे.  लोककल्याणाच्या विविध योजनांमधून ही विकासाची गंगा अशाच पध्दतीने पुढे नेहण्यासाठी जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी,अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि जनतेने सहकार्य करावे असे आवाहन यानिमित्ताने मंत्री महोदयांनी केले.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हयात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव मंत्री अशोक उइके यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये लोकसभा निवडणूक निवडणूक 2019 मध्ये दुर्गम भागात काम केलेले अधिकारी कर्मचारी, कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस यांचा सन्मान झाला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्हयात क्रमांक मिळालेल्या जांभळी, अरततोंडी व मानापुर या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. आरोग्य विभागातील माता बाल संगोपन व आरोग्य विषयक कामांमध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचारी यांनाही यावेळी मंत्री,डॉ.अशोक उइके यांनी सन्मानित केले. महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार  2017 वितरण या वेळी करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा अधिकारी मदन टापरे यांनी केले तर कार्यक्रमला उपस्थित असणा-यांचे आभार उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना निळ-ठुबे यांनी मानले.