जिल्हा परिषदेच्या निधीवर आमदाराचे अतिक्रमण-सुरेश हर्षे

0
12

गोंदिया,दि.19 : जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये हस्तक्षेप करून निधी वळवून एक आमदार श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे जि.प.सदस्यांचे अधिकार आणि अस्तित्त्वावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा मुद्दा जि.प. च्या स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प.सदस्य सुरेश हर्षे यांनी उपस्थित करुन लक्ष वेधले. दरम्यान सदस्यांनी या प्रकारावर अधिकाऱ्यांना जाब विचारून आपला रोष व्यक्त केला. जि.प.च्या निधीवर केले जाणारे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे जि.प. प्रशासनाने याची वेळीच दखल घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.जि.प.च्या स्थायी समितीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सीमा मडावी व समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सभेला सुरुवात होताच सुरेश हर्षे यांनी जिल्ह्यातील एक आमदार राज्य शासनाकडून निधी खेचून आणून विकासकामे करण्याऐवजी जि.प.च्या अधिकारातील निधीवर डोळा ठेवीत असल्याचा आरोप केला. हा प्रकार चुकीचा आहे. जि.प.पदाधिकारी जि.प.तील विकासकामे मंजूर करताना सदर आमदार आपल्या लेटर पॅडवर कामाची नावे सुचवून ही कामे घेण्याच्या सूचना करीत आहेत. जिल्हा नियोजन समितीमध्ये जि.प.ला प्राप्त होणारा निधी आपण दुसरीकडे वळता होऊ देणार नाही, असा पवित्रा जि.प.सदस्य सुरेश हर्षे यांनी घेतला. जि.प.ची कामे मंजूर करण्याचे अधिकार नेमके कुणा कुणाला आहे, असा मुद्दा उपस्थित केला. यावर अध्यक्षांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला यावर पुढील सभेत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले..