बाल शक्ती, बाल कल्याण पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

0
22

वाशिम, दि. २० : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कारासाठी ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या मुलांनी (वय पाच वर्षांपेक्षा अधिक व वय १८ वर्षे पर्यंतचे) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ,नावीण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेले आहे त्यांना बाल शक्ती पुरस्कार दिला जातो.बालकल्याण पुरस्कारांमध्ये वैयक्तिक पुरस्कार मुलांचा विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी, उदात्त भावनेतून किमान सात वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येईल. संस्थास्तरावर बाल कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेला पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णपणे शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान दहा वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करणारी संस्था असावी.

बालशक्ती पुरस्कार २०१९ व बालकल्याण पुरस्कार २०१९ करिता केंद्र सरकारने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज www.nea-wcd.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी कळविले आहे.