अंगणवाड्यांतील प्रकार : नागरिकांची कारवाईची मागणी

0
9

नवेगावबांध : येथील आठही अंगणवाड्यांमधून लाभार्थ्यांना एक्सपायर आहाराचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाककृती-१ व पाकृती-२ नावाचे होऊनही त्याचा लाभार्थ्यांना पुरवठा होत असल्याने हा प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा आरोप परिसरात होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, पंचायत समिती अर्जुनी/मोरगावच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत येथील आठ आंगणवाड्यांमधून बालक, किशोरवयीन मुली, गरोदर महिला व स्तनदा मातांना पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. सदर पोषण आहार पाककृती-१ व पाककृती-२ नावाने सध्या पुरविला जात आहे. सदर आहाराची निर्मिती समता महिला बचत गट (गोंदिया) यांनी केलेली असल्याचे दिसून येते. या उत्पादनाचा बॅच नं. पी.एम. 0१/0 १५ व उत्पादनाचा दिनांक फेब्रुवारी २0१५ सीआरएएम ९९0 असा उत्पादनावर प्रकाशित आहे. सदर उत्पादनाचा कालावधी उत्पादन निर्मितीच्या दिनांकापासून दोन महिने राहिल असा देखील उल्लेख पाकीटावर आहे.
परंतु अशा कालबाह्य उत्पादानांचा बिनधास्तपणे वाटप करण्यात येत आहे. जि.प. आरोग्य विभाग तसेच महिला व बालकल्याण विभाग यांच्या निष्काळजीपणामुळे ही चुक झालेली आहे. याचा अर्थ असा की पदाधिकारी कमजोर व शासकीय यंत्रणा वरचढ झालेली दिसत असल्याचेही बोलले जाते. पुरवठादार व प्रशासकीय यंत्रणा यांचे काही लागेबांधे असल्याचा संशय देखील घेण्यात येत आहे.
सदर बाब गंभीर स्वरुपाची असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य महादेव बोरकर व किशोर तरोणे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.