डॉक्टर निलंबित : हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

0
10

गोरेगाव : तालुक्यातील पाथरी येथील एका विद्यार्थिनीचा क्षुल्लक आजाराने मृत्यू झाला. तिच्यावर योग्य उपचार होऊ न शकण्यास कुऱ्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि कर्मचारीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवत वैद्यकीय अधिकारी डॉ.सी.पी.लांजेवार यांना निलंबित करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, प्रेमलता भुवनलाल समूने (१६ वर्षे) या दहावीच्या विद्यार्थिनीला दि.१५ एप्रिल रोजी हगवण व उलटीचा त्रास झाल्यामुळे कुऱ्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. सकाळी ८.३० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात कुणीच कर्मचारी व डॉक्टर उपस्थित नव्हते. सकाळी ९.३० वाजता आरोग्य केंद्र उघडण्यात आले, पण परिचारीका व डॉक्टर उपस्थित नसल्याने उपचार करण्यास वेळ झाला. शेवटी परिचारीका वानखेडे, सार्वे व एका परिचर महिलेने उपचार सुरु केले, पण उपचार योग्य प्रकारे होऊ न शकल्यामुळे त्या विद्यार्थिनीवर थातूरमातूर उपचार करुन घरी पाठवण्यात आले.

घरी आल्यावर प्रेमलताच्या अंगावर चट्टे येऊन तिला घबराट सुटल्याने गोंदिया येथे उपचारासाठी नेण्याचे ठरले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. वास्तविक कुऱ्हाडी प्रा.आ.केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना उपचाराअभावी परत जावे लागते. त्यामुळे गावकऱ्यांनी चांगलाच रोष व्यक्त करणे सुरू केले.
या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी नागरिकांसह भाजपा तालुका सचिव बबलू बिसेन, हिरापूरचे सरपंच व भाजपा जिल्हा सहसचिव सतीश रहांगडाले, कुऱ्हाडीचे पोलीस पाटील हेमराज सोनवाने, माजी पं.स. सदस्य मुलचंद खांडवाये, सिद्धार्थ साखरे, आनंद कटरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी सी.पी. लांजेवार उपस्थित नव्हते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोग्य सभापती मदन पटले यांनी तातडीने डॉ.आर.डी. त्रिपाठी व डॉ. एन.जी.अग्रवाल यांना सोबत घेऊन घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली. त्यात अनेक गैरप्रकार आढळले.