बाबासाहेबांच्या अवमानप्रकरणी गडचिरोलीत कडकडीत बंद

0
13

गडचिरोली- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरुन तसेच त्यांच्या फोटोवर फुली मारुन धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ गडचिरोली येथे आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बाजारपेठ बंद ठेवली. यावेळी कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौकात निषेध सभा घेऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
शंकर संदेश व दीपक तलवार सावरकर अशा दोन फेसबूक खात्यावरुन मोबाईलवर मेसेज पाठवून बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या इसमांवर कठोर कारवाई करुन उपरोक्त प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, या मागणीसाठी आज गडचिरोली येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. सकाळी कार्यकर्त्यांनी व्यापारी व दुकानदारांना आपापली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. त्यानंतर इंदिरा गांधी चौकात निषेध सभा घेण्यात आली. या सभेत उपस्थितांनी घटनेचा निषेध करुन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.