अमरावती विद्यापीठाच्या बीएड् परीक्षेत ऐनवेळी भलताच पेपर!

0
7

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा महाप्रताप
विशेष प्रतिनिधी
अमरावती- पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी असलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीद्वारे बीएड् परीक्षेचे आयोजन २० एप्रिल ते ७ मे पर्यंत अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम व यवतमाळ येथे करण्यात आले आहे. २० एप्रिल रोजी बीएड्‌चा पहिला पेपर ‘उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक आणि शिक्षण’ हा होता. परंतु त्याऐवजी बीएड्‌च्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना ‘शैक्षणिक मानसशास्त्र’ हा दुसरा पेपर सोडविण्यास सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी पार गोंधळात सापडले. ही परिस्थिती जवळपास पाचही जिल्ह्यांमध्ये होती.याचे चित्र महाविद्यालयासमोर बघावयास मिळाले.त्यानंतर विद्यापीठाला जाग आली आणि अमरावतीच्या विद्यापीठ परिसरात कुलगुरुच्या उपस्थितीच या घोडचुकीवर मंथन सुरु झाले.
अकोला येथील लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय या केंद्रावर तसेच मंगरुळपीर येथील आज बीएड् अभ्यासक्रमाचा पहिला पेपर सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होता. सर्व विद्यार्थी परीक्षा देण्याकरिता नियोजित वेळेपूर्वी उपस्थित झाले होते. सुरुवातीस कोणत्याही परीक्षा खोलीमध्ये सकाळी ९.३० पर्यंत प्रश्‍नपत्रिका वितरितच करण्यात आल्या नाहीत. फक्त उत्तरपत्रिका वितरित करण्यात आल्या. जेव्हा विद्यार्थ्यांनी प्रश्‍नपत्र देण्यास एवढा उशीर का होत आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला, तेव्हा लरातो वाणिज्य महाविद्यालय या केंद्रावरील पर्यवेक्षकांनी सांगितले की, विद्यापीठाच्या चुकीमुळे पहिल्या प्रश्‍नपत्राऐवजी दुसर्‍या प्रश्‍नपत्रिकेचे गठ्ठे पाठविण्यात आले आहेत!
लरातो महाविद्यालय केंद्रावरील परीक्षा नियोजनाशी संबंधित काही जणांनी तर, पहिल्या प्रश्‍नपत्राऐवजी ‘शैक्षणिक मानसशास्त्र’ हे प्रश्‍नपत्र सोडविण्यास तुम्हाला काय हरकत आहे, असा बिनकामाचा मोफत सल्लाही दिला. लरातो महाविद्यालय हेच एक केंद्र नव्हे, तर विदर्भातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत येणार्‍या सर्वच जिल्ह्यांच्या केंद्रांवर ही नियोजनशून्य गंभीर परिस्थिती दिसून आली.
विद्यापीठाच्या या हलगर्जीपणामुळे व नियोजनाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना कमालीचा मनस्ताप व त्रास सहन करावा लागला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ वाया गेला. या प्रतापामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होऊन त्यांच्या टक्केवारीवर याचा परिणाम होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
केंद्रावरील कर्मचार्‍यांनी तांत्रिक चुकीचे कारण समोर करून, तर कधी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेवटी विद्यार्थ्यांना परीक्षा न देता बाहेर पडावे लागले. सदर केंद्रावरील पर्यवेक्षकांकडून सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की, कुलसचिवांच्या नावे विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीनिशी एक निवेदन करा व आम्हाला द्या, त्यानंतर पुढे काय करायचे आहे, ते आम्ही बघू. त्याप्रमाणे सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी तशा प्रकारचे निवेदन संबंधितांना दिले.
तथापि आज, २० एप्रिल रोजीचा पेपर कधी व कोणत्या तारखेला होईल, या परीक्षार्थ्यांच्या प्रश्‍नाला कोणीही, काहीही उत्तर दिले नाही, हे विशेष. मात्र, अमरावतीहून मिळालेल्या माहितीनुसार आजचा पेपर रद्द ठरवून पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे.