उन्हाळी धानासाठी खरेदी केंद्र सुरू करा-गंगाधर परशुरामकर

0
11

गोंदिया : जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात उन्हाळी धानाचे पिक घेण्यात आले असून धान निघायला सुरूवात झाली आहे. अशात शासनाने त्वरीत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्याची जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे.
गोंदिया धानाचा जिल्हा म्हणून राज्यातच काय देशात प्रख्यात आहे. येथील शेतकर्‍यांचे धान हेच मुख्य पिक असून यंदाही मोठय़ा प्रमाणात उन्हाळी धानाचे पिक घेण्यात आले आहे. काही ठिकाणी धान निघण्यास सुरूवात झाली आहे. मात्र खरेदीदार नसल्याने शेतकर्‍यांना ८00-९00 रूपये दराने आपले धान विकावे व्यापार्‍यांना विकावे लागत आहे. दरवर्षी पेक्षा यंदा उन्हाळी धानाचे पिक जास्त प्रमाणात आहे. मात्र हमी भाव धान खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यापूर्वी धान खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने आता सत्तेत असलेली मंडळी चांगलाच गोंधळ घालत होती. मात्र सत्तेत येताच त्यांना याचा विसर पडल्याचे दिसते. त्यामुळे त्वरीत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मुख्यमंत्री फडणवीस व नागरी पुरवठा मंत्री बापट यांच्याकडे केली आहे.
तसेच येत्या आठ दिवसांत केंद्र सुरू न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आंदोलन करणार असा इशाराही देण्यात आल्याचे गंगाधर परशुरामकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.