ड़ॉ. विकास आमटे यांना ‘नागभूषण’ पुरस्कार जाहीर

0
14

नागपूर : नागपूर शहराच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या वतीने विदर्भातील विविध क्षेत्रातील ज्या ज्या व्यक्तींनी विदर्भाच्या विकासासाठी भरघोस कार्य केले, विदर्भाचा लौकिक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविला, समाजकार्यासाठी आयुष्य वेचले व नि:स्पृहतेने देशसेवा केली अशा मान्यवरांना नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी एक लाख रुपयांचा पुरस्कार व मानचिन्ह देऊन गौरविण्यात येतो. यंदा २0१५चा ‘नागभूषण पुरस्कार’ महारोगी सेवा समिती, ‘आनंदवन’ वरोरा, जि. चंद्रपूर अंतर्गत समाजातील उपेक्षित बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारे डॉ. विकास आमटे यांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा फाऊंडेशनतर्फे करण्यात आली आहे.

आतापर्यंत हा पुरस्कार स्व. आर. के. पाटील, नितीन गडकरी, भन्ते सुरई ससाई, जी. एम. टावरी, स्व. प्राचार्य राम शेवाळकर, डॉ. प्रकाश आमटे व मंदाताई आमटे, मारुती चितमपल्ली, महेश एलकुंचवार, स्व. कवी ग्रेस, राजकुमार हिराणी, ठाकुरदासजी बंग, अँड़ व्ही. आर. मनोहर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर आदी मान्यवरांना देऊन गौरविण्यात आले आहे. डॉ. विकास आमटे कुष्ठरोगींच्या हक्कासाठी लढणारे लढवय्ये सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आपल्या समाजसेवेतून लाखो कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. १९४९ साली प्रसिद्ध समाजसेवक मुरलीधर देविदास उपाख्य बाबा आमटे यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली असून याअंतर्गत कुष्ठरोगींवर उपचार आणि त्यांचे पुनर्वसन करणे हा उद्देश आहे. या माध्यमातून कुष्ठरोग्यांना बरे करून प्रतिष्ठापूर्ण आणि आत्मसन्मानाने जीवन जगण्यासाठी झटणे तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटणे आदी कार्य केले.

बाबा आमटे यांचा वारसा डॉ. विकास आमटे यांनी पुढे सुरू ठेवला. ते चिकित्सक असले तरी त्यांनी आपल्या कृतीतून एक तज्ज्ञ अभियंता, शिल्पकार, कृषितज्ज्ञ व मानवी हक्क कार्यकर्ता असल्याचे दाखवून दिले. त्यांच्या या उत्तुंग सामाजिक कार्याबद्दल त्यांना १९८८ मध्ये स्वीडन येथे युनायटेड नेशन्स राईट लाईव्हहूड पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय मानव सेवा पुरस्कार, कुष्ठमित्र पुरस्कार, नेमीचंद श्रीश्रीमल पुरस्कार, महादेव बळवंत नातू पुरस्कार व कुमार गंधर्व पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे, हे येथे उल्लेखनीय.