विविध योजनांच्या समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास शक्य – मोहन राठोड

0
9

वर्धा : विविध योजनांच्या समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास सहज शक्य आहे. प्रत्येक योजना आपल्या गावात यावी यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक सतर्क असल्यास गावाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक मोहन राठोड यांनी केले.
हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांसाठी माहिती अभियानांतर्गत हिंगणघाट येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात मोहन राठोड प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती संजय तपासे यांनी दीपप्रज्वलित करून माहिती कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती मिलींद कोपुलवार, ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्रीपाद अपराजित, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी राजेंद्र भूयार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पी. राजू, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे श्री. भालेराव आदी उपस्थित होते.
श्री. मोहन राठोड म्हणाले, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. जन्माच्या अगोदरपासून ते निराधार शवापर्यंत विविध शासकीय योजना आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीत वर्धा जिल्हा अग्रेसर आहे. तरीही लोकप्रतिनिधी सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी शासकीय योजनांचा बारकाईने अभ्यास करावा. विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचवून ग्रामीण भागाचा विकास करावा. श्रीपाद अपराजित म्हणाले, माणसाला माणसाचे दुःख झोंबले पाहिजे. त्यांच्या दुःखाच्या निवारणासाठी शासकीय कल्याणकारी योजना पारदर्शक आणि प्रामाणिक, डोळसपणे शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधी ग्रामसेवक, तलाठी यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आधुनिक काळाची गरज लक्षात घेता सर्वांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. संगणक, इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापरही जनकल्याणासाठी केला पाहिजे. यावेळी राजेंद्र भूयार, संजय तपासे, वरिष्ठ भूवैज्ञानिक नितीन महाजन, ग्रामीण विकास यंत्रणेचे श्री. भालेराव, डॉ. पी. राजू, श्री. करे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, सूत्रसंचालन विनेश काकडे तर आभार विजय धापके यांनी केले.