उद्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाची निवड

0
8

मुंबई : बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधींची बैठक होत असून या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड होणार आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाच मुदतवाढ मिळण्याची शक्यता अधिक असून बदल करायचे ठरल्यास दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात येईल. मुंबईच्या अध्यक्षपदासाठी सचिन अहीर व नवाब मालिक यांची नावे चर्चेत आहेत.
निवडणुकीची प्रक्रिया सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षांतर्गत सुरू असून बुधवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात प्रदेश प्रतिनिधींची बैठक होणार असून या बैठकीत प्रदेशाध्यक्ष व प्रमुख पदाधिका-यांची निवड करण्यात येईल. प्रदेशाध्यक्षपदासाठी दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर अशी अनेक नावे चर्चेत असली तरी तुर्तास सुनील तटकरे यांचीच फेरनिवड केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबईचे अध्यक्षपद माजी खासदार संजय पाटील यांच्याकडे आहे. हे पद आता माजी राज्यमंत्री सचिन अहीर यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महापालिकेत एमआयएमने मारलेली मुसंडी व मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन मुंबईचे अध्यक्षपद नवाब मालिक यांच्याकडे सोपवावे, असा काही लोकांचा आग्रह असला तरी सचिन अहीर यांचे पारडे जड आहे.