गडेरीच्या “त्या”तीन नक्षल्यांचे आत्मसमर्पण

0
24

गडचिरोली-: एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस ठाण्यांतर्गत गडेरी येथील “ते” तीन युवक नक्षलवादीच असून, त्यांनी आत्मसमर्पण केल्याचा दावा आज पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. दुसरीकडे, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, अॅड.जगदीश मेश्राम व महेश राऊत तसेच कथित नक्षल्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी पकडून नेलेले युवक नक्षलवादी नसून पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने पकडून नेल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस ठाण्यांतर्गत गडेरी येथील मल्लेश उर्फ सुकरु दलसू मट्टामी, प्रभू उर्फ रमेश मानू ईस्टामी व राजू उर्फ सोमजी उसेडी हे तिघेही नक्षलवादी असून, त्यांनी १५ एप्रिल रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. मल्लेश मट्टामी हा कसनसूर एलओएसचा उपकमांडर असून, प्रभू ईस्टामी व राजू उसेंडी हे दोघे प्लाटून क्रमांक ३ चे सदस्य आहेत. त्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे नक्षल चळवळीला प्रचंड हादरा बसल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.
दरम्यान पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक काढण्यापूर्वी भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, अॅड.जगदीश मेश्राम व महेश राऊत तसेच कथित नक्षल्यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन उपरोक्त तिन्ही युवक निरपराध असल्याचे सांगून त्यांचा नक्षल्यांशी कोणताही संबंध नाही व पोलिसांनी त्यांना गावातून जबरदस्तीने पकडून नेल्याचा आरोप केला. १० एप्रिलला सकाळी ७ वाजता कोटमी पोलिस ठाण्यातील पोलिस आमच्या गावात आले. त्यांनी चौकात उभे असलेल्या उपरोक्त तिन्ही युवकांना मारहाण करुन कोटमी पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर गावपाटील डोलू सोमा ईस्टाम हे कोटमी पोलिस ठाण्यात विचारणा करण्यास गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली, असा आरोप डॉ. कोपुलवार, अॅड.जगदीश मेश्राम व महेश राऊत तसेच गडेरीच्या गावकऱ्यांनी केला. त्या तिन्हीयुवकांना पकडून नेल्याच्या घटनेला १८ दिवस पूर्ण होऊनही पोलिसांनी त्यांच्याविषयी आम्हाला कुठलीही माहिती दिली नाही. तिन्ही युवक स्वत: कमावते असून, पत्नी, लहान मुले व वृद्ध आई-वडिलांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. परंतु तिघांनाही पोलिस घेऊन गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्या तिघांचीही तत्काळ सुटका करुन त्यांना बेकायदेशीरपणे पकडून ठेवणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही भाकप नेते व त्या युवकांच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत केली.