भाजपाचे आजपासून महासंपर्क अभियान

0
16

गोंदिया : भारतीय जनता पक्षाने १ नोव्हेंबरपासून सुरु केलेले महासदस्यता अभियान ३० एप्रिलला पूर्ण झाले. जिल्ह्यात सदस्यता नोंदणीची लक्ष्यपूर्ती झाली असून या अभियानाचे पुढचे पाऊल म्हणून नोंदणी झालेल्या सदस्यांसोबत प्रत्यक्ष संपर्क व संवाद करण्यासाठी १ मे पासून महासंपर्क अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी पत्रपरिषदेत दिली.

शासकीय विश्रामगृहात आयोजित या पत्रपरिषदेला आ. विजय रहांगडाले, माजी आ. डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. खोमेश रहांगडाले, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अग्रवाल यांनी सांगितले, भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात सदस्यता अभियानाची सुरुवात २५ डिसेंबर २०१४ ला केली. जिल्ह्याला सदस्य नोंदणीचे सव्वा लाखाचे मिळालेले उद्दिष्ट पुर्ण झाले असून दीड लाख सदस्य नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले.

महासंपर्क अभियानांतर्गत भाजपाचे सदस्य बनलेल्या नागरिकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांची पक्षाविषयीची मनोभावना समजून घेणे हा या महासंपर्क अभियानाचा उद्देश राहणार आहे. सदस्यता अभियानात मतदारांना मनदाता बनविण्याचा प्रयत्न तर मनदात्यांना कार्यकर्ता बनविण्याची प्रक्रिया आहे.

माजी आ.भेरसिंग नागपुरे हे या अभियानाचे जिल्ह्याचे प्रमुख राहणार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही भाजपा मोठे यश प्राप्त करेल, असा विश्वासही यावेळी विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला.