महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यासह तिघे निलंबित

0
31

यवतमाळ – दि. ५ –कृषिपंप ग्राहक शेतकऱ्याला वीज वितरण कंपनीने अवाजवी बिल पाठविले. याविरुद्ध त्या शेतकऱ्याने वीज कंपनीकडे तक्रार केली. उलट वीज वितरण कंपनीने त्या शेतकऱ्यावर वीजचोरीचा ठपका ठेवला. त्या शेतकऱ्याने राज्याच्या ऊर्जामंत्र्यांची भेट घेऊन आपल्यावर झालेला अन्याय कथनही केला. अखेर आज, सोमवारी सकाळी वीजबिलाच्या धसक्‍याने त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यासह तिघांना निलंबित करण्यात आले आहे.
चिमणगाव बाजापूर (ता. बाभूळगाव) येथील रहिवासी अमरलाल एस. मणिहार (वय 86) यांनी आपल्या शेतातील विहिरीवर कृषिपंप बसविला. त्यासाठी त्यांनी विद्युत मीटरही घेतले. मात्र, त्या मीटरचे त्यांना 61 हजार 387 रुपये बिल आले. अमरलाल यांनी 20 ऑक्‍टोबर 2014 रोजी वीजवितरण कंपनीकडे याबाबत तक्रार केली. सहायक अभियंता संजय कांबळे यांनी खोटा पंचनामा तयार केला. 12 महिन्यांचे वीजबिल निर्धारणाचा कायदा असताना 18 महिन्यांचे निर्धारण करून वीजबिलाची व दंडाची रक्कम वाढविण्यात आली. या काळात डीपी जळाली असताना 75 दिवस वीजपुरवठा बंद होता. त्याचाही दंड व इतर आकार बिलामध्ये लावला. शिवाय वीज कंपनीने अमरलाल मणिहार यांच्यावर वीजचोरीचा आरोप केला. या आरोपामुळे वयोवृद्ध अमरलाल यांना मानसिक धक्का बसला. तेव्हापासून ते सतत आजारी होते. सोमवारी सकाळी अमरलाल यांचा मृत्यू झाला. अमरलाल यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शनिवारी (ता.2) यवतमाळ येथील आढावा बैठकीदरम्यान भेट घेतली होती. महावितरणचे अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी केली. चौकशीतही तसे आढळून आले. यामुळे मुख्य अभियंत्याच्या आदेशावरून यवतमाळ मंडळचे अधीक्षक अभियंता अशोक फुलकर, बाभूळगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता सुरेश झाडे व बाभूळगाव शहर वितरण केंद्राचे सहायक अभियंता संजय कांबळे यांच्यावर सोमवारी (ता.4) तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. अमरलाल यांच्या मृत्यूला महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप मणिहार यांच्या नातेवाइकांनी आज पत्रकार परिषदेत केला.