योजनांची माहिती व समस्यां सोडवण्यासाठी समाधान शिबीर उपयुक्त – पालकमंत्री बडोले

0
15

गोंदिया, दि.१६ : शासनाच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी व मिळालेल्या माहितीच्या आधारावर योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी समाधान शिबीर उपयुक्त आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.आज (ता.१६) अर्जुनी/मोरगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत आयोजित विस्तारीत स्वरुपातील समाधान शिबिराचे उदघाटन पालकमंत्री बडोले यांनी केले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी हे होते. तर माजी आमदार दयाराम कापगते, जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती प्रकाश गहाणे, पं.स.सभापती तानेश ताराम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नामदेवराव कापगते, माजी कृषी समिती सभापती उमाकांत ढेंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, अनेक नागरिक, शेतकरी, शेतमजूर त्यांच्या कामानिमीत्त तालुक्याच्या ठिकाणी विविध कार्यालयात जातात. परंतू अनेकदा त्यांना त्यांचे काम न होताच गावाकडे परतावे लागते. अशाप्रकारच्या शिबिराच्या आयोजनामुळे त्यांच्या समस्यांची सोडवणूक होण्यास मदत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या माध्यमातून अनेकांना ३९ क्षेत्रात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. येत्या १९ व २० मे रोजी गोंदिया येथे आयोजित मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवतींनी लाभ घ्यावा असे आवाहनही याप्रसंगी पालकमंत्रयांनी केले.
वनहक्क जमिनीचे पट्टे लाभार्थ्यांना देण्याबाबत महसूल व वन विभागाने पुढाकार घेऊन लाभार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता केवळ धान पिकाची शेती न करता भाजीपाला, नगदी पिके व शेतीपुरक दुग्ध व्यवसाय करावा, त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने २५०-३०० शेतकऱ्यांना एकत्र करुन चांगल्या शेतीपुरक व्यवसायासाठी प्रोत्साहीत करावे, त्यामुळे त्यांची आर्थिकस्थिती सुधारण्यास मदत होईल.
जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून कृषी व सिंचन क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दयावे. सिंचनाची व्यवस्था झाली तर कृषी क्षेत्रात निश्चितच बदल दिसून येईल. कालव्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावी. लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने विकास कामाचे नियोजन करणे गरजेचे आहे. नवेगाव व नागझिरा पर्यटन क्षेत्राचा विकास आराखडा तयार करुन आराखड्याची योग्य अंमलबजावणी करुन जिल्ह्याचे चित्र बदललेले दिसेल असा विश्वास पालकमंत्रयांनी व्यक्त केला. ज्या धान खरेदी संस्थांकडे स्वत:च्या जमीनी आहेत त्यांना गोदाम बांधून देण्यात येईल. आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अर्जुनी/मोरगाव येथे वसतिगृहाचे बांधकाम व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा बांधण्यात येणार आहे.
झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल याची ग्वाही देऊन पालकमंत्री पुढे म्हणाले, पुनर्वसन करतांना ज्या ५१ शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे, तो अन्याय वन विभागाने दूर करावा. माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतल्यास सिंचनाची मोठी व्यवस्था जिल्ह्यात निर्माण होईल असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या विमा योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता केवळ धान पिकावर अवलंबून न राहता नगदी पिकाकडे वळले पाहिजे.
जलयुक्त शिवार अभियानात ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन करुन डॉ.सूर्यवंशी म्हणाले, या अभियानामुळे टंचाई सदृश्य परिस्थितीवर मात करण्यास मदत होईल. जास्तीत जास्त या अभियानात काम करुन पाणीटंचाईवर मात करण्यासोबत कृषी उत्पादनात वाढ करावी. गावातील कोणताही लाभार्थी योजनांच्या लाभांपासून वंचित राहू नये यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
यावेळी उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगांवकर, राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार संतोष महाले यांनी केले. संचालन प्रा.शरद मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार गटविकास अधिकारी जी.डी.कोरडे यांनी मानले. यावेळी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नागरिक, लाभार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.