५८ हजार १२० कुटूंबाना मिळाले हक्काचे घरकूल

0
8

७ हजार ७७९ घरकुलांना मंजूरी
गोंदिया, दि.२3 : सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येतात. सुरक्षित निवारा असणे ही मानवाची मुलभूत व महत्वपूर्ण गरज आहे. ऊन, वारा, थंडी व पावसापासून संरक्षण देणारे हक्काचे घर असावे. हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते व कुटूंबियाना सुरक्षित जीवन देण्याचे ध्येय असते. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा दारिद्रयरेषेखालील बेघर कुटूंबाना त्यांचे हक्काचे घर मिळवून देणारी इंदिरा आवास योजना शासनाद्वारे राबविण्यात येते. जिल्हयात ग्रामीण भागात एकूण २ लाख ५१ हजार ४८३ कुटूंबे आहेत. यापैकी दारिद्रयरेषेखालील कुटूंबाची संख्या १ लाख ४४ हजार २४३ एवढी आहे. या कुटूंबाना निवाऱ्याकरीता ग्रामपंचायत निहाय बेघर कुटूंबाची कायम प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. त्यानूसार जिल्हयातील ५८ हजार १२० कुटूंबाना इंदिरा आवास योजना, राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द योजना व मागास भागांसाठी अनुदान निधी योजनेमार्फत शंभर टक्के अनुदानावर लाभ देण्यात आला आहे. वर्ष २०१४-१५ या वर्षाकरीता इंदिरा आवास योजनेअंतर्गत ७ हजार ७७९ कुटूंबाना घरकूलासाठी मंजूरी देण्यात आली आहे. दारिद्रयरेषेखाली कुटूंबाच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटल्यामुळे त्यांचे राहणीमान उंचावले आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे दारिद्रयनिर्मुलन करण्यासाठी, गावातील वंचित घटकांना एकत्र आणून त्यांच्या संस्था उभारण्यासाठी या संस्थमार्फत गरजूना वित्तीय संस्था पुरविणे, दारिद्रयरेषेखालील नागरिकांना उपजिविकेचे साधन उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा फायदा नागरिकांना विकासाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करत आहे.