बी.एस. फोर वाहनांची नोंदणी ३१ मार्चपासून होणार बंद

0
145

वाशिम, दि. ०२ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बी. एस. फोर मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंतच होणार आहे. ३१ मार्च नंतर फक्त बी.एस. सिक्स वाहनांची नोंदणी होणार आहे. वाहनांचे नोंदणी शुल्क, कर यांचा भरणा केलेला असला तरीही ३१ मार्च नंतर बी.एस. फोर मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी केली जाणार नाही. फायनान्स कंपन्यांकडील थकीत प्रकरणे, वाहन मालकाचे आजारीपण, वाहन मालकाचा अपघात अशा कारणास्तव नोंदणी करायची प्रलंबित असलेल्या बी.एस. फोर वाहनांची नोंदणी प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत २० मार्च २०२० पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी केले आहे.

संगणकीय वाहन नोंदणी प्रणालीवर ३१ मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत बी. एस. फोर वाहनांची नोंदणी होणार नाही. संबंधित वाहनधारकांनी याची दक्षता घेऊन तातडीने वाहन नोंदणी करून घ्यावी. संगणक प्रणालीतील बदल पाहता वाहन वितरक व वाहन मालकांना बी. एस. फोर वाहनांची नोंदणी मुदतीपूर्वीच करून घ्यावी, असे श्रीमती सय्यद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

गुढी पाडव्याच्या वाहन खरेदीची प्रक्रिया अगोदरच पूर्ण करा

यंदा २५ मार्चला गुढी पाडवा आहे. या मुहूर्तावर वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी किमान ६ ते ७ दिवस अगोदर आपल्या वाहनाचे शुल्क, कराचा भरणा करावा. जेणेकरून एचएसआरपी नंबर प्लेट बसवून वितरक आपणाला गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर २५ मार्च रोजी वाहनाच देवू शकतील. ३१ मार्चनंतर आलेल्या किंवा विक्री झालेल्या एकाही बी. एस. फोर वाहनाची नोंदणी होणार नाही, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी कळविले आहे.