शेतकऱ्यांनी संघटित शेतीकडे वळावे -किशोर तरोणे

0
58

नवेगावबांध,दि.04ः-सध्याची शेती ही परवडण्याजोगी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी संघटित होऊन शेतीचे गट स्थापन करून संघटित पद्धतीने शेती करावी असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी केले.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत बीजोत्पादन प्रकल्पांतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी संशोधन केंद्र नवेगावबांध यांच्यावतीने उन्हाळी भात लागवड तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी किशोर तरोणे कार्यक्रमाचे उद्घाटक या नात्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते.सदर कार्यक्रम सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही च्या डॉक्टर उषा डोंगरवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी रघुनाथ लांजेवार, अण्णा पाटील डोंगरवार,महादेव बोरकर,जी.आर.श्यामकुवर,बी.एन. चौधरी,एन.के.कापसे,आर.एफ.राऊत आदींच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला.शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक पद्धतीकडे वळावे त्याचप्रमाणे भात पिकाशिवाय नगदी पीक घेण्याकडे वडणे काळाची गरज असल्याचे तरोणे म्हणाले.प्रमुख मार्गदर्शक डॉ श्यामकुवर यांनी शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा पॉलिथिनटनेलचा वापर केल्यास धानाचे रोप लवकर लागवडीत येतात कृषी केंद्रावरून बियाणे न घेता आपल्याच शेतातील बियाणे वापरावेत यामुळे उत्पादन खर्च कमी केला जाऊ शकतो व शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो असे ते म्हणाले. कीटकशास्त्रज्ञ चौधरी यांनी पिकावर येणाऱ्या किडी व रोगांचे नियंत्रण श्री पद्धत व पट्टा पद्धतीचा वापर इत्यादी बद्दल सविस्तर मार्गदर्शन करून जैविक व ऑरगॅनिक शेती कडे शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहन केले.उषा डोंगरवार यांनी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून व बीजप्रक्रिया करूनच बियाण्याचे पेरणी करावी असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.तसेच नवेगावबांधचे प्रभारी अधिकारी तथा आयोजक आर.एफ.राऊत यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल प्रास्ताविक सादर केले.
संचालन निखिल बोकडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर कापसे यांनी मानले.प्रशिक्षणाला नवेगाव बांध,देवलगाव,कोहलगाव,मुंगली,पांढरवाणी,परसोडी आदि गावातील शेतकरी महिला व पुरुष मंडळी बहुसंख्य उपस्थित होते.