तत्काळच्या बुकींमध्ये गडबड : तिरोडा स्थानकाच्या काऊंटर क्लर्कला अटक

0
13

तिरोडा दि.३0 : रेल्वे स्थानकात अनेक दिवसांपासून तिकिटांचा काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवान आपली दृष्टी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर ठेवून आहेत. तसेच संदिग्ध तिकीट दलालांच्या ठिकाणांवरही गुप्त नजर ठेवली जात आहे. अशाच एका प्रकरणात तिरोडा रेल्वे स्थानकावर कार्यरत बुकिंग क्लर्कला तिकिटांचा काळाबाजार करताना पकडण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक एस.यू. डोंगरे यांनी रेल्वे आरक्षण केंद्र तिरोडा येथे गुप्तपणे पहारेदारी ठेवली होती. दरम्यान सकाळी १० वाजता बुकिंग क्लर्कने स्वत:जवळ ठेवलेले तत्काल आरक्षण आवेदन फॉर्मांवर तिकीट काढून आपल्या ताब्यात ठेवले. यानंतर बाहेरील व्यक्तींच्या नावावर आरक्षण आवेदनानुसार तत्काल तिकिटे जारी केले.
याबाबत संशय आल्यावर कार्यरत स्थानक व्यवस्थापक तिरोडा यांना आवेदन देवून प्रकरण समरी तसेच तत्काल तिकिटांचे विवरण तपासण्याची परवानगी मागण्यात आली. परंतु स्थानक व्यवस्थापकाने लिखित स्वरूपात सांगितले की, लाईन क्लियर ड्युटीमध्ये व्यस्त असल्यामुळे ड्युटीनंतरच बुकिंग कार्यालयात जावू शकू. अशास्थितीत बाहेरील दोन साक्षीदारांना तिरोडा आरक्षण केंद्रात बोलविण्यात आले.
बुकिंग क्लर्क उमेशकुमार टेंभरे याला सांगून बुकिंग कार्यालयाचा दरवाजा उघडण्यात आला. दरम्यान बुकिंग क्लर्कने आपल्या ताब्यात लपवून ठेवलेले आरक्षण तिकीट तसेच मागणी पत्रांना आपल्या मुठ्ठीत दाबून फेकण्याचे प्रयत्न केले. परंतु रेल्वे सुरक्षा दलाच्या टास्क चमूने आरक्षण तिकिटांना पकडले. कनिष्ठ बुकिंग क्लर्क उमेशकुमार याच्या ताब्यातून तिकिटे व मागणी पत्र जप्त करण्यात आले. त्याने सांगितले की, एका दिवसापूर्वी गोंदिया येथील रहिवासी विशाल गिलानी याच्या आवेदनावर त्याने तत्काल आरक्षण तिकीट काढली. यापूर्वीसुद्धा अनेकदा कमिशन घेवून त्याने विशालसाठी आरक्षण तिकिटे दिल्याची बाब स्वीकार केली.
चौकशी दरम्यान दैनिक टर्मिनल केस समरी साक्षीदारांसमोर बुकिंग क्लर्कने काढली. यात एकूण रक्कम २६ हजार ०४५ रूपये दिसून आले. तत्काल तिकिटे व सामान्य तिकिटांची एकत्रित रक्कम त्यावेळी २४ हजार ३१५ रूपये आढळली. अर्थात एक हजार ७३० रूपये कमी आढळले. यासाठी बुकिंग क्लर्कने स्वत:ला जबाबदार सांगितले.विशाल गिलानी रेल्वे आरक्षण तिकिटांचा अवैध व्यापार करतो व रेल्वे तिकिटांच्या काळ्या बाजारात संलग्न असल्याची बाब बुकिंग क्लर्कने स्वीकार केली.