शहर पोलीस ठाण्याच्या आवारात आग

0
15

गोंदिया दि.30– : गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील जुन्या इमारतीत मागच्या बाजुने असलेल्या एका टिनाच्या खोलीला आग लागून त्यातील संपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली. ही कागदपत्रे महत्वाची नसून टाकाऊच असल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस अधीक्षकांचे कार्यालय पतंगा मैदानात गेल्यानंतर रिकाम्या झालेल्या त्या इमारतीत शहर पोलीस स्टेशनचा कारभार स्थानांतरित करण्यात आला. त्यामुळे त्याच आवारात असलेल्या जुन्या शहर पोलीस ठाण्याच्या मागील बाजुने ज्या ठिकाणावरून पूर्वी ‘डी.बी.’चा (शोध शाखा) कारभार चालत होता त्याच खोलीत ही आग लागली. स्लॅबच्या पक्क्या खोलीच्या बाजुनेच बनविलेल्या टिनाच्या खोलीत काही जुनी कागदपत्रे ठेवलेली होती. जुन्या आरोपींची माहिती, छायाचित्रे व इतर कागदपत्रे त्यात असल्याचे समजते.
सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही आग लागल्याचे लक्षात येताच पोलीस कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र ते पोहोचेपर्यंत आगीच्या भडक्याने बाहेरील खोलीतून मुख्य इमारतीच्या खिडकीलाही कवेत घेत आतमधील पंख्याची वायरिंगही राख केली.सकाळी सर्वजण उठलेले असताना आग एवढी भडकेपर्यंत कोणाच्या लक्षात कसे आले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय ही आग नेमकी कशामुळे लागली हे सुद्धा गुलदस्त्यात आहे.