१५ दिवसात सुरू होणार ‘भेल’चे काम-कृपाल तुमाने यांची माहिती

0
15

भंडारा : तत्कालीन संपुआ सरकारने कॅबिनेटची मंजुरी न घेता केवळ भूमिपूजन करुन ठेवलेल्या ‘भेल’ प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला येत्या १५ दिवसात प्रारंभ होणार असून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हे प्रकल्पस्थळी येणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी शुक्रवारला आयोजित पत्रपरिषदेत दिली.

यावेळी ते म्हणाले, केंद्रातील काही मंत्र्यांनी प्रकल्पाला विरोध केल्यामुळे हा प्रकल्प सुरू करण्यासाठी काही अडचणी आल्या होत्या. त्यामुळे या प्रकल्पाविषयी संभ्रम निर्माण झाला होता. वीज निर्मितीसाठी कोळशाची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. त्यासाठी अन्य देशातून कोळसा आयात करावा लागत आहे. सद्यस्थितीत सौर ऊर्जेला भरपूर वाव असल्यामुळे केंद्र सरकारने सौर ऊर्जेवर उपकरणे तयार करण्यावर भर दिला आहे. आता ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत येणारा हा देशातील कारखाना ठरणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी २,७०० कोटी रुपये मंजूर करुन या प्रकल्पातील अडचणी दूर केल्या आहेत. एक वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून यात केंद्राचा ७५ टक्के तर राज्याचा २५ टक्के सहभाग राहणार आहे. या प्रकल्पात सौर ऊर्जेचे टर्बाईन, सोलर प्लेट ही उपकरणे तयार करण्यात येतील. हे काम २०१५ च्या पर्यंत पूर्ण करुन २०१६ च्या प्रारंभी उत्पादन सुरू होईल. या प्रकल्पात दोन हजार लोकांना प्रत्यक्ष तर पाच हजार लोकांना अप्रत्यक्ष असे सात हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगितले.यावेळी खा.तुमाने म्हणाले, शिवसेना जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे. त्यासाठी आम्ही निवडणूक समिती गठीत केली असून अधिकाधिक जागा जिंकून भंडारा जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे लक्ष्य आहे. पत्रपरिषदेला माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, राजेंद्र पटले, अजय तुमसरे, सुनिल कुरंजेकर, हेमंत बांडेबुचे उपस्थित होते.