गोंदिया,दि.11ः- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसुल विभागासह इतर विभागात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी शिबिर आज सोमवारला(दि.11) उपविभागीय अधिकारी कार्यालय व होमियोपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आले.या आरोग्य शिबिराला उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते,होमियोपॅथी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डाॅ.राध्येश्याम (बबली)अग्रवाल,डाॅ.बी.एन.वारजुरकर,डाॅ.रोशन कानतोडे,डाॅ.हर्षा कानतोडे,डाॅ.सपना पटले,डाॅ.इल्तियाषा गुप्ता आदी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी जयस्तंभ चौकातील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या महसुल विभागासह सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी श्रीमती सवरंगपते यांनी होमियोपॅथी महाविद्यालायचे संस्थापक प्राचार्य डाॅ.राधेश्याम (बबली)अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून सहकार्य करण्याची विनंती केली.त्यावर अग्रवाल यांनी आपल्या वैदयकिय महाविद्यालयाची चमू आज सकाळपासूनच डाॅ.रोशन कानतोडे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन दिल्याने आरोग्य तपासणीला सुरवात झाली आहे.या आरोग्य तपासणीमध्ये सर्व कर्मचारी यांची स्क्रिनींग करुन त्यांना तीन दिवसाचे केंद्रसरकारच्या आय़ुष विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेले औषध निशुल्क देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन कठोरपणे उपाय योजना करत आहे. यासाठी सर्वच कर्मचारी २४ तास सेवेत असतात. यावेळी त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.आरोग्य शिबिरासाठी वैद्यकिय महाविद्यालयाचे व उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.





