तंबाखू मुक्ती करुन चालणार नाही तर हा कार्यक्रम बहुआयामी असायला पाहिजे – डॉ.अभय बंग

0
15

गडचिरोली दि. २३-: जिल्ह्यात तंबाखू मुक्तीसाठी दंडात्मक कारवाई न करता जनजागृती, कृती, प्रचार व प्रसार, माहिती, संस्कृती व वातावरण या यासारखे बहुआयामी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सर्चचे संचालक डॉ. अभय बंग यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दारू-तंबाखू मुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रमाच्या बैठकीत बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित दारू-तंबाखू मुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम समितीची बैठक जिल्हाधिकारी रणजितकुमार यांचे अध्यक्षतेखाली सर्च शोधग्रामचे संचालक डॉ.अभय बंग यांचे मार्गदर्शनात झाली. बैठकीला अन्न औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एम.एस. केंबळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड, जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे, उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवने, जिल्हा शल्य चिकीत्सक प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी व इतर विभागाचे शाखा प्रमुख उपस्थित होते.

यावेळी डॉ. बंग म्हणाले, तंबाखू मुक्ती अंमलबजावणीसाठी सर्व शासकिय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, स्काऊट गाईड, स्वयंसेवक, शिक्षक, विद्यार्थी, एनसीसी व समाज सेवी संघटनानी पुढाकार घेऊन समाज जागृती केल्यास तंबाखू मुक्ती करणे शक्य होईल. व्यसनमुक्ती ही बंदी न करता व्यसनापासून नागरिकांना वाचवून त्यांचे जीवन वाचविल्यास खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा आर्थिक व सामाजिक विकास होईल. प्रत्येक कार्यालयामध्ये येणारे लाभार्थी तसेच नागरिक गुटखा सारखे तंबाखूजन्य पदार्थ सेवन करुन आल्यास त्यांना तंबाखूमुळे होणाऱ्या विपरीत परिणामाची माहिती देऊन व्यसनापासून परावृत्त करावे.

यावेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी सर्व अधिकाऱ्यांना तंबाखू मुक्तीसाठी स्वत: अंमलबजावणी करुन जनतेला व्यसनापासून परावृत्त करावे. कार्यालयात दर्शनी भागात तंबाखूमुक्तीचा संदेश देणारे फलक लावावे. तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या विभागाचा तंबाखू मुक्ती बाबत आकृतीबंध तयार करुन 30 जून पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत शोधग्रामचे संतोष सावळकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती विस्तृतपणे सादर केली.