गोंदिया,दि.08ः –महाराष्ट्र राज्य काॅस्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात आज सोमवारला(दि.08) 16 एप्रिल 2015 नंतर रुजू झालेल्या बंधपत्रित अधिपरिचारिकांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीला घेऊन राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.त्या आंदोलनांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ४९ बंधपत्रित अधिपरिचारिकांनी स्थायी करण्याच्या मागणीसाठी जिल्हा सामान्य केटीएस रुग्णालय परिसरात फिजिकल डिस्टिसंगचे अंतर पाळत एकदिवसीय आंदोलन करीत शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. शासनाने बंधपत्रीत परिचारिकांना सामावून घेताना भेदभाव केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातंर्गत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संशोधन केंद्र (डीएमईआर), केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, बाई गंगाबाई महिला रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात कार्यरत ४९ बंधपत्रित परिचारिकांनी स्थायी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. 15 एप्रिल 2015 पर्यंतच्या सर्व बंधपत्रित परिचारिकांना स्थायी करण्यात आले. मात्र, 16 एप्रिल 2015 ते 2019 पर्यंत जेवढ्यांना नियुक्त करण्यात आले,त्या सर्वांना स्थायी करु असे लेखी आरोग्य विभागाने दिल्यानंतरही लागलेल्या बंधपत्रित अधिपरिचारिकांना वगळून शासन अन्याय करत असल्याचे या परिचारिकांचे म्हणणे आहे. या तिन्ही रुग्णालयात कार्यरत ४९ परिचारिकां जवळपास बंधपत्रित परिचारिका याकाळात लागलेल्या असून, त्यांना अद्यापही शासन सेवेस स्थायी करण्यात आलेले नाही. स्थायी परिचारिकांसारखेच काम यासुध्दा परिचारिका करत आहेत. तर दुसरीकडे कोरोनासारख्या काळातही परिचारिका सेवा देत आहेत.





