गोंदिया दि. 8 (जिमाका) पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आज गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळेच्या तपासणी केंद्राचे ई-उद्घाटन मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार विजय रहांगडाले जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे,जि. प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी,पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ श्याम निमगडे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ विनायक रुखमोडे यांची प्रमुख उपस्थिती.
पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने परिस्थितीच्या आढावा घेतला. आज जिल्ह्यात दोन कोरोना बाधित रुग्ण शिल्लक असल्याची माहिती घेतली तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांनी शुभेच्छा देऊन सर्वांचे अभिनंदन केले.
पूर्वी कोरोना चाचणीसाठी सर्व नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत होते, त्याकरिता तीन ते पाच दिवसाचा वेळ लागत होता परंतु आता जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळेच्या तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर केवळ सहा तासात नमुने चाचणीचे अहवाल प्राप्त होतील. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा आणखी दक्षतेने सज्ज होईल. गोंदिया जिंकेल, कोरोना हारेल असा विश्वास व्यक्त करून त्यांनी जिल्हा प्रशासनाचा उत्साह वाढविला.
पालकमंत्र्यांनी यावेळी कोरोना चाचणी प्रयोगशाळा तपासणी केंद्राची कार्यप्रणाली डॉ. दिलीप गेडाम,मुख्य तज्ञ कोरोना चाचणी प्रयोगशाळा गोंदिया यांचेकडून जाणून घेतली.
पालकमंत्री यांना माहिती देताना डॉ.गेडाम यांनी सांगितले की,या मशीनची क्षमता एका दिवसात 120 नमुने तपासणी करण्याची आहे. ऑटोमोेटेड आरएनए मशीन लवकरच येणार आहे. ती आल्यानंतर नमुने तपासणी क्षमता दुप्पट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.सदर प्रयोगशाळेतील मुख्य तज्ञ व त्यांच्या सर्व चमुनी विशेष दक्षता घेऊन तसेच शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेचे काटेकोरपणे पालन करून कार्य करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.पालकमंत्र्यांनी प्रयोगशाळेतील चाचणीमध्ये नमुने घेण्यापासून त्याचा अहवाल येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया जाणून घेतल्या.
गोंदिया येथील कोरोना चाचणी प्रयोगशाळा तपासणी केंद्राकरिता जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी 80 लक्ष रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. त्यातील 1 कोटी 52 लक्ष रुपये प्रयोगशाळेतील विविध उपकरणावर खर्च करण्यात आला आहे. या प्रयोगशाळा तपासणी केंद्राकरिता एक मुख्य तपासणी अधिकारी,तीन सहायक तपासणी अधिकारी व इतर तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्वांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.या प्रयोगशाळा तपासणी केंद्रामुळे कोरोना संशयितांचे निदान लवकर होण्यास मदत होईल व प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित करता येणार आहे.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. दिलीप गेडाम, विभाग प्रमुख तथा प्रिन्सिपल इन्वेस्टिगेशन( मुख्य तज्ञ), डॉ.प्रशांत पाटील औषध वैद्यक शास्त्र तज्ञ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया, डॉ.मनोज तालापल्लीवार, उपअधीक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया, डॉ. संजय माहुले सहाय्यक अधीक्षक,डॉ. प्रशांत तुरकर आदी उपस्थित होते.




