युरियाचे दर पाच वर्षे वाढू देणार नाही-दानवे

0
9

तिरोडा दि.२८: : भाजपाचे सरकार शेतकरी हिताचे सरकार असून शेती पाच वर्षे युरीयाचे दर वाढू देणार नाही असा निर्णय केंद्र शासनाने घेतल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. ते कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात आयोजित जि.प. व पं.स. उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, प्रमुख अतिथी म्हणून खा. नाना पटोले, पूर्व विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठीवार, प्रदेश महामंत्री रामदास आंबडकर, महिला मोर्चाच्या अर्चना डेहणकर, माजी आ. भजनदास वैद्य, हरीश मोरे, खोमेश्‍वर रहांगडाले, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, अशोक इंगळे, लिखेंद्र बिसेन उपस्थित होते. दानवे पुढे म्हणाले, पूर्वी शेतकर्‍यांचे ५0 टक्के नुकसान झाले तरच नुकसान भरपाई दिली जात असे. मात्र शासनाने ते प्रमाण ३३टक्केपर्यंत खाली आणले आहे. रक्ताच्या नात्यात मालमत्तेचे हस्तांतरण करण्याकरिता लागणारी स्टॅप ड्यूटी शासनाने रद्द केली आहे.
तिरोडाचे आ.विजय रहांगडाले यांनी आपल्या प्रास्ताविकात क्षेत्रातील समस्या मांडल्या. धापेवाडा उपसासिंचन योजना पूर्ण झाल्यास येथील शेतकरी समृद्ध होईल व बेरोजगारी कमी होईल. चोरखमारा व खैरबंदा जलाशयात प्रकल्पाचे पाणी सोडल्यास हजारो एकर शेतीला सिंचन मिळेल असेही ते म्हणाले.
खा.नाना पटोले यांनी राष्ट्रवादी नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी अदानी विद्युत प्रकल्पाला देवून शेतकर्‍यांचा तोंडचा घास हिसकावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली. अदानी विद्युत प्रकल्पास राज्य व केंद्र शासनाची ६0 टक्के सबसीडी असून सबसीडीचा पैसा हा जनतेचा पैसा आहे. प्रकल्पाची किंमत अवास्तव दाखवून हा प्रकल्प सबसीडीच्या पैशातूनच उभा झाला आहे, असे ते म्हणाले. शेतकर्‍यांच्या धानाला व कोकणातील हापूस आंब्याला चांगला भाव न मिळण्यामागे माजी कृषीमंत्री शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला. एका स्थानिक राष्ट्रवादी नेत्याने गरीब महिलांकडून लक्षावधी रुपये लुबाडल्याचे ते म्हणाले. ना.राजकुमार बडोले यांनी केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली. धानाला ३५0 रुपये दर वाढवून दिला.रमाई घरकुल योजनेंतर्गत लाभाथर्र्ींना ५0 हजारापर्यंत भूखंड देऊन त्यावर घरकुल बांधून देण्याची योजना, जनसामान्यांकरिता पेंशन योजना, ओबीसींना शिष्यवृत्ती आदी संदर्भात माहिती दिली व शासनाच्या योजना जनमानसापर्यंत पोहोचविण्याकरिता जि.प. व पं.स. मध्ये भाजप उमेदवार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जि.प. उपाध्यक्ष मदन पटले यांनी केले. याप्रसंगी सर्व जि.प. व पं.स. उमेदवार उपस्थित होते.