शेतकर्‍यांनो, भाजपाच्या काळात आले का अच्छे दिन?

0
12

तिरोडा दि.२८: : धानाला ३000 रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचा वादा करणार्‍या भाजपाच्या नेत्यांनी सांगावे की यावर्षी धानाला किती भाव मिळाला, असे म्हणत शेतकरी बंधुनो, भाजपाच्या काळात आपल्यासाठी अच्छे दिन आलेत काय, असा प्रश्न राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात जाहीर सभामध्ये विचारला.
खा.पटेल म्हणाले, शेतकर्‍यांच्या धानाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महागाई प्रचंड वाढली, सर्वसामान्यांच्या जेवणातून दाळ तर गायबच झाली आहे. हेच आहेत का आपल्यासाठी अच्छे दिन, असा खोचक सवाल पटेल यांनी विचारला.
केंद्रातील सरकारने बेरोजगारांना रोजगार देण्याचे केवळ स्वप्न दाखविले. आपल्या भागातील किती युवकांना रोजगार मिळाला? या सरकारने युवकाची फसवणुक केली.भूमि अधिग्रहण हा कायदा आणून शेतकर्‍यांची जमीन हडपण्याचे षडयंत्र हे भाजपा सरकार करीत आहे.
आपल्या जिल्ह्यासाठी वर्षभरात नवीन रेल्वे मिळाली काय, खत व बियाण्यांची कमतरता दूर झाली काय? असे प्रश्न विचारत प्रफुल्ल पटेल यांनी सत्ताधार्‍यांवर टीकेची झोड उठविली.
शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक व आपणासर्वांची फसवणूक करणार्‍या या भारतीय जनता पार्टीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत धडा शिकवून नेहमी विकासाची भूमिका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केले.