रविवारी नागपुरात आदिवासी समाजाचा प्रबोधन मेळावा

0
16

नागपूर दि. ११:अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी विकास विभाग व विविध आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी(ता.१२) दुपारी १२ वाजता नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात आदिवासी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राहतील. आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार सोमजीभाई दामोर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री तथा विधान परिषदेचे माजी उपसभापती प्रा.वसंत पुरके, परिषदेचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष बिरसा तिरकी, राज्य जंगल कामगार सहकारी संघाचे अध्यक्ष वासुदेवशहा टेकाम आदी मान्यवर उपस्थित राहतील.
या मेळाव्यात आदिवासी समाजाच्या यादीत बोगस आदिवासींचा समावेश रोखणे, आदिवासी विद्यार्थ्यांना प्रभावीपणे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देणे, विशेष केंद्रीय साहाय्य योजनांची माहिती देणे व अन्य विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला आदिवासी समाजातील नागरीक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ अध्यक्ष्‍ा अॅड. मनिराम मडावी, विदर्भ संपर्कप्रमुख आर.यू.केराम, गडचिरोली जिल्हाध्यक्ष घनश्याम मडावी, नागपूरचे माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी, वर्धा जिल्हाध्यक्ष नामदेवराव मसराम, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रमोद बोरीकर आदींनी केले आहे.