जिल्‍हाधिकारी डॉ.सूर्यवंशींनी केली गोंदिया शहराची पाहणी

0
9

गोंदिया, दि.१६ : गोंदिया शहरातील काही भागाची पाहणी करुन साचलेली घाण व कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असल्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना त्या भागातील कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी १५ जुलै रोजी गोंदिया शहरातील काही भागाचा फेरफटका मारुन शहरातील अस्वच्छतेबाबत नगरपालिका अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी गणेशनगर मैदान, सुबोध चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती चौक, सिंधी शिक्षण संस्था परिसर, श्रीनगर माता मंदिर सुकराम भवन, श्रीनगर शंकर किराण स्टोर्स समोर, गुरु गौरक्षणनाथ मंदिर श्रीनगर, सिंधी कॉलनी परिसर, यादव चौक परिसर, रेल्वे पुलाजवळ, रामनगर रोड, गुजरी बाजार चौक रामनगर व क्षत्रीय सेलीब्रेशन हॉल समोरील भागाची पाहणी केली.
पावसाळ्याच्या दिवसात नाल्या वाहत्या कराव्यात. त्यामुळे नाल्यांमध्ये कचरा साचून नाल्यातील घाण पाणी रस्त्यावरुन वाहणार नाही व मच्छरांचा उपद्रवसुद्धा वाढणार नाही. नागरिकांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईन कुठे फुटली असेल तर त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. त्यामुळे नागरिकांना दुषित पाणीपुरवठा होणार नाही व जलजन्य आजारांना आळा बसण्यास मदत होईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. घाण कचऱ्‍याचे साम्राज्य पसरलेल्या भागात तातडीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून साफसफाई करण्याचे निर्देश उपस्थित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.