युवावर्गाला स्वावलंबी व रोजगार प्राप्तीसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आवश्यक – डॉ. विजय सूर्यवंशी

0
23

गोंदिया, दि.१६ : वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे आवश्यक असून युवक-युवती यामधून स्वावलंबी होण्यासोबत रोजगार प्राप्त करण्यासाठी सक्षम होतील. असे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १५ जुलै रोजी जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची सभा डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, विविध क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. औद्योगिक क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा वापर मोठया प्रमाणात करण्यात येत असतांना सुध्दा औद्योगिक क्षेत्राला सुध्दा कुशल मनुष्यबळाची कमतरता भासते. औद्योगिक क्षेत्रात ज्या कामासाठी कौशल्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या कौशल्यप्राप्त कामगार निर्मितीसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. जिल्हयातील युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगार प्राप्त करण्यासाठी त्यांना बांबूवर आधारित साहित्य व वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यामुळे ते स्वावलंबी बनून रोजगार प्राप्त करतील.
अनेक युवक-युवतींमध्ये सुप्त कौशल्य गुण असतात असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, त्यांच्या कौशल्य गुणांचा विकास घडून आणण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे युवक-युवती स्वावलंबी होण्यास निश्चित मदत होणार असल्याचे सांगितले.
यावेळी सन २०१५-१६ या वर्षात कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत टॅली, कॅम्प्यूटर अकाऊंटीग, सीएनसी, व्हीएमसी, कॅम्प्यूटर हॉर्डवेअर रिपेअरिंग, प्लम्बींग, ईलेक्ट्रीशियन, बांधकाम पर्यवेक्षक डाटा एन्ट्री ऑपरेटर या विषयावर युवक-युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात यावे. असेही जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
सभेमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम २०१४-१५ या वर्षात ४५० मुलांमुलींना आदरातिथ्य, बांधकाम, आटोमोबाईल्स या क्षेत्रात प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती व आज १५ जुलै रोजी ५० युवक-युवतींची तुकडी बांधकाम व आदरातिथ्य या प्रशिक्षणासाठी लातूर व औरंगाबाद येथे पाठविण्यात आल्याची माहिती रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक श्री भोयर यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली.
जागतिक युवा कौशल्य दिनाचा औचित्य साधून जिल्हयातील अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे सहायक महाव्यवस्थापक डॉ. विजय गंधेवार, गोंदिया येथील वसंत फाईनआर्ट लिथोवर्कचे संचालक सुनिल धोटे, एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष हुकूमचंद अग्रवाल, एमआयडीसीमधील सोना उद्योग लि.चे श्री वधवा, लाख इंडस्ट्रिंज असोसिएशनचे अध्यक्ष गजानन अग्रवाल, खमारी येथील माहेश्वरी सालव्हंट उद्योग व्यवस्थापक आनंद तिवारी या नामांकित उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या गोंदिया येथील गणेश शिक्षण संस्थेचे संचालक गजानन उमरे, गोरेगाव येथील पार्वती बहुउद्देशिय संस्थेचे संचालक लिलेश्वर रहांगडाले, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यक्रम समन्वयक विशाल मेश्राम आणि तिरोडा येथील आनंद मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक आनंद गहरवार यांचाही यावेळी सत्कार करण्याता आला. जिल्हास्तरीय कौशल्य विकास कार्यकारी समितीचे सदस्य सर्वश्री, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे प्रकल्प अधिकारी गिरीष सरोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी हरीश कळमकर, जिल्हा उद्योग केंद्राचे डी.एम.शिवणकर, गोंदिया येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री मलेवार, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे राजेंद्र आगाशे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प अधिकारी एच.के.बदर, प्रथम एज्यूकेशन संस्थेचे फाऊंडेशन मुंबईचे प्रदीप कश्यप, कृषि विभागाच्या अश्विनी घोरपडे, समाजकल्याण विभागाचे मुकेश केदार, महिला व बालकल्याणच्या नम्रता चौधरी आदि. उपस्थित होते.
जागतिक युवा कौशल्याचे औचित्य साधून दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित मुख्य
शासकीय कार्यक्रमाचे थेट प्रसारण उपस्थित समितीच्या सर्व सदस्यांनी बघितले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाचे औचित्य साधून देशवासीयांना संबोधित केले. जिल्हयातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये दिल्ली येथील मुख्य शासकीय कार्यक्रमाचे प्रसारण व पंतप्रधानांचे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांनी ऐकले.