हत्येतील मुख्य आरोपीला अटक करा

0
6

पत्रपरिषदेत केली मागणी, तीव्र आंदोलनाचा इशारा

गोंदिया दि. २०: छेदीलाल इमलाह यांच्या हत्येला ३५ दिवस लोटूनही त्यांच्या हत्येतील मुख्य आरोपी पंकज यादव व दस्सू यादव पोलिसांच्या हाताबाहेर आहेत. हत्येला एवढा कालावधी लोटून गेल्यावरही पोलीस त्यांना पकडण्यात अपयशी ठरत असल्याने यात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप अभिमन्यू चतरे यांनी केला. रविवारी (दि.१९) आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
या पत्रपरिषदेला मृत छेदीलाल इमलाह यांच्या पत्नी रिना इमलाह, त्यांचा मुलगा हर्ष इमलाह, भाऊ भिम इमलाह तसेच समाजबांधव अनिल रघुवंशी, रोशन शेंद्रे, तिलक दिप, अमित बिरीया, रितूराज अरखेल, सतीश मोहते, देवराज महावत, सचिन शेंद्रे उपस्थित होते. याप्रसंगी चतरे यांनी, मृत्यूपूर्वीछेदीलाल इमलाह यांनी पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले होते. यात त्यांनी पंकज यादव, लोकेश (कल्लू) यादव, संदीप (दस्सू) यादव, उत्तम यादव, कान्हा यादव, कार्तीक बैरागी, राकेश यादव, बाबू यादव, विनोद यादव, गुलशन यादव, नरेश नागपूरे, धिरज यादव आदिंपासून जीवीताला धोका असल्याचे नमूद केले होते. यावरून छेदीलाल इमलाह यांना या लोकांपासून धोका असल्याचे स्पष्ट होते. असे असतानाही पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला.
विशेष म्हणजे याप्रसंगी अनिल रघुंवशी यांनी, छेदीलाल यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले खरे आरोपी नसून शूटर बाहेरून बोलाविण्यात आले होते. त्यांना आता मध्यप्रदेश राज्याच्या सिमेबाहेर पाठविण्यात आल्याचे म्हटले. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना पकडल्याचे कळते. मात्र पोलिसांकडून आम्हाला काहीच सांगीतले जात नसून फक्त आरोपींचा शोध सुरू असल्याचेच सांगीतले जात असल्याचे म्हटले.
घटनास्थळी छेदीलाल यांचा मृतदेह पडून होता मात्र पोलीस उशीरा आली. त्यातही आश्‍चर्य म्हणजे, आम्ही रात्री ३ वाजता पोलिसांना बंदूकीची गोळी शोधून दिली होती. यातून पोलीस किती तत्परतेने प्रकरणाचा तपास करीत आहेत. हे दिसून येत असून तत्कालीन पोलिसांना याबाबत माहिती होत असा आरोपही रघुवंशी यांनी केला.
तर काही दिवसांपूर्वी सहायक पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी समाजातील एका अल्पवयीन मुलाला मारहाण केली होती. याप्रकरणी मृत छेदीलाल इमलाह यांनी सपोनी गीतेंवर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात गीते यांना ३-४ दिवस निलंबीत करण्यात आले होते. त्याचाच राग पोलिसांच्या डोक्यात होता व नशिबाने या प्रकरणाचा तपासही गीतेंनाच देण्यात आला व त्यांनी आपला राग यातून दाखवून दिल्याचेही ते म्हणाले.
तर रिना इमलाह यांनी, काही दिवसांपूर्वी पंकज यादव यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत छेदीलाल यांना काहीच माहिती नव्हती. उलट पोलिसांची मदत करवून देण्यासाठी त्यांनी हल्ला करणार्‍या मुलांना अटक करवून दिली होती असे सांगीतले. तर या प्रकरणाच्या योग्य तपासाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिल्याचे त्यांनी सांगीतले.