तीन कोटींचे चुकारे अडले

0
11

अर्जुनी-मोरगाव दि. २२: आदिवासी विकास महामंडळाने शासकीय आधारभूत हमी भाव दराने शेतकऱ्यांचे खरेदी केलेल्या उन्हाळी धानाचे अद्यापही चुकारे मिळाले नसल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आधीच धानाला भाव नसतानाही अडचणीपोटी विक्री केलेल्या धानाचे चुकारे अडल्याने शेतकऱ्यांची उपासमार होत आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या अधिकाऱ्यांनी तातडीने चुकाऱ्यांची व्यवस्था करण्याची मागणी प्रतापगड येथील गोपीनाथ दरवडे यांनी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शासनाने आदिवासी महामंडळ व सहकारी संस्थाच्या माध्यमातून उन्हाळी धान पिक खरेदी ३० जूनपर्यंत केली. आदिवासी महामंडळामार्फत १ हजार ३६० रुपये हमी भावाप्रमाणे १८ हजार २५६ क्विंटल धान खरेदी केली.

या खरेदीचे मूल्य २ कोटी ४८ लाख २८ हजार १६० रुपये होते. शिवाय ४५ लाख ६४ हजार १४० रुपयांचे सानुग्रह अनुदान आहे. असे एकूण सुमारे ३ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे चुकारे शिल्लक आहेत. या रकमेच्या हुंड्या बँकेत वटविल्या असूनही बँकेमार्फत अद्यापही चुकारे देण्यात आले नाहीत.

याविषयी संस्थेचे उपाध्यक्ष गोपीनाथ दरवडे यांनी ११ जुलै रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत हा विषय चर्चेला आणून ठरााव पारित केला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांना या ठरावाची प्रत दिली व शासनस्तरावर महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांचेकडे पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे.