सभापतिपदासाठी अनेकांची दावेदारी

0
6

भंडारा दि. २२: ५२ सदस्यीय जिल्हा परिषदेत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुन सत्ता स्थापन केली. आता २८ जुलै रोजी होणार्‍या विषय समितीच्या निवडणुकीत सभापतिपदासाठी अनेकांनी पक्षश्रेष्ठीकडे दावेदारी केल्यामुळे कोणत्या सदस्याच्या गळ्यात पदाची माळ पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १९, राष्ट्रवादी काँग्रेसचे १५, भाजपचे १३, शिवसेना १ आणि अपक्ष ४ असे पक्षीय बलाबल आहे. ६ जुलैला निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापण्यासाठी राजकारण तापले. त्यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात समविचारी पक्षाशी आघाडी करण्याचे सुतोवाच दिले होते. त्यापूर्वीच काँग्रेसचे नेते माजी आमदार सेवक वाघाये यांनी पत्रपरिषद घेऊन काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी झाल्यास अध्यक्ष पदासह तीन सभापती पदावर काँग्रेसचा दावा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात झालेल्या काँग्रेस – भाजप युतीमुळे भंडारा जिल्ह्यात कुणाशी युती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु युती समविचारी पक्षांशी झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्‍वास सोडला. परंतु, आता विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने तीन जागांवर दावा सांगितल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपावरुन पुन्हा तणातणी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून पोहराचे विनायक बुरडे, आसगावच्या चित्रा सावरबांधे, कोथुर्णाचे प्यारेलाल वाघमारे हे दावेदार असून चित्रा सावरबांधे या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. आता त्यांना पद मिळण्याची शक्यता बळावली आहे. सेंदुरवाफाचे होमराज कापगते हे दावेदार आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसकडून सिल्लीचे नरेश डहारे, येरलीच्या रेखा ठाकरे, गर्राच्या शुभांगी राहांगडाले हे दावेदार आहेत. आता दोन्ही काँग्रेसला तालुक्याचे संतुलन साधत पद देताना कसरत करावी लागणार आहे.