36.9 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 5667

सालेकसा व देवरी तालुक्यात अतिवृष्टी

0

२४ तासात सरासरी २६ मि.मी.पाऊस
जिल्ह्यात सरासरी ८३७.६ मि.मी.पाऊस
गोंदिया,दि.११ : जिल्ह्यात १ जून ते ११ सप्टेबर २०१६ या कालावधीत २७६४०.९ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ८३७.६ मि.मी. इतकी आहे. आज ११ सप्टेबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ८५८.१ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी २६ मि.मी. इतकी आहे. आजपावेतो जिल्ह्यात ७१ टक्के पाऊस झाला आहे. देवरी तालुक्यात मुल्ला मंडळ विभागात १२ मि.मी., देवरी मंडळात ८० मि.मी., चिचगड मंडळात १०३ मि.मी. पाऊस पडला, असा एकूण देवरी तालुक्यात सरासरी ६५ मि.मी. पाऊस पडला. सालेकसा तालुक्यात कावराबांध मंडळ विभागात ५४ मि.मी., सालेकसा मंडळात ११४ मि.मी., साकरीटोला मंडळात ३३ मि.मी. पाऊस पडला, असा एकूण सालेकसा तालुक्यात सरासरी ६७ मि.मी. पाऊस पडल्याने अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे.
११ सप्टेबर रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- ३१ मि.मी. (४.४), गोरेगाव तालुका- १५.३ मि.मी. (५.१), तिरोडा तालुका- १११ मि.मी. (२२.२), अर्जुनी मोरगाव तालुका- १९५.२ मि.मी. (३९.०), देवरी तालुका- १९५ मि.मी. (६५.०), आमगाव तालुका- ५६.६ मि.मी. (१४.२), सालेकसा तालुका- २०१ मि.मी. (६७.०) आणि सडक अर्जुनी तालुका- ५३ (१७.७), असा एकूण ८५८.१ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी २६ मि.मी. इतकी आहे.

बोनससाठी आदिवासी मजूर झिजवितो वन विभागाचे उंबरठे

0

देवरी – सन २०१४ च्या हंगामातील तेंदूपाने तोडणाऱ्या मजुरांना मिळालेले बोनस आपल्यालाही मिळावे, म्हणून तालुक्यातील एक आदिवासी मजूर गेल्या सहा महिन्यापासून वनविभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. परंतु, चिचगड येथील वनाधिकारी हे त्याला बोनसची रक्कम न देता देवरीच्या बँकेत चकरा मारायला लावत आहेत. परिणामी, वनाधिकाऱ्यांच्या चुकांची शिक्षा एका गरीब आदिवासीला का? असा आर्त प्रश्न त्या आदिवासी मजुराने सरकारला केला आहे.

सविस्तर हकिगत अशी की, वनविभागाच्या चिचगड वन परिक्षेत्रांतर्गत कडीकसा बीटात २०१४ च्या हंगामात तेंदूपाने तोडण्यात आली होती. त्या कामाची प्रोत्साहन राशी मजुरांना वाटप करण्यासाठी मार्च २०१६ मध्ये चिचगड कार्यालयाला प्राप्त झाली. हे बोनस पाचशे रुपयांपेक्षा अधिक असल्याने सदरची रक्कम ही धनादेशाने देण्याचे शासनाचे नियम आहेत. त्यामुळे सर्व मजुरांकडून त्यांचे बँक खात्याचे विवरण घेण्यात आले. त्यानुसार, कडीकसा येथील रहिवासी मुरलीधर भोजराज भंडारी या मजुराने आपल्या महाराष्ट्र बँकेतील खात्याचा क्रमांक तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे दिला. त्या कर्मचाऱ्याने मुरलीधरचा महाराष्ट्र बॅेकेचा खाते क्रमांक चिचगड कार्यालयात बिनचुक दिला. परंतु, वनविभागातील लिपिकाने मुरलीधरच्या नावापुढे महाराष्ट्र बँकेचा उल्लेख न करता यादीत भारतीय स्टेट बँकेच्या देवरी शाखेचा उल्लेख केला. परिणामी, मुरलीधरच्या मजुरीचे २ हजार ६६७ एवढी रक्कम महाराष्ट्र बँकेऐवजी स्टेटबँक देवरीकडे गेली. यामुळे मुरलीधरला त्याच्या मजुरीचे पैसे मिळाले नाही. ते पैसे मिळावे म्हणून मुरलीधर हा चिचगडच्या वनविभागाचे गेल्या सहा महिन्यापासून चकरा मारत आहे. तेथील वरिष्ठ लिपिक आणि संगणक परिचालक देशमुख हे त्याला उडवाउडवीची उत्तरे देऊन हाकलून लावत असल्याचा आरोप मुरलीधर व त्याचे वडील भोजराज यांनी केला आहे. सदर मजुराला स्टेट बँकेत जाऊन पैसे घे,असे सांगत असल्याने मुरलीधर आपल्या वडिलांसह देवरीच्या स्टेट बँकेत चकरा मारत आहे. तेथे सुद्धा त्याला समाधान कारक उत्तर बँकेचे अधिकारी देत नसल्याचे भोजराज भंडारी यांनी सांगितले. अनेकवेळा अर्ज करा असे सांगून नंतर ते अर्जसुद्धा घेत नसून दिवसभर बँकेत बसवून ठेवत असल्याचे भंडारी यांचे म्हणणे आहे. बँकेने सुद्धा त्यांचेकडील रक्कम अद्यापही वनविभागाच्या कार्यालयाला परत केली नाही. त्यामुळे एका गरीब आदिवासी मजुराची मजुरी बुडणार तर नाही ना, या भीतीने भंडारी कुटुंबीय चिंतातूर आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन मजुरी मिळण्यास मदत करावी, अशी मागणी मुरलीधर व त्याचे वडील भोजराज भंडारी यांनी वनविभागाकडे केली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी चिचगड येथील वनाधिकाऱ्यांसी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

कुरखेडाच्या सती नदीला पूर

0
 गडचिरोली,दि. ११ – जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कुरखेडाच्या सती नदीला पूर आला आहे. पुलावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने कुरखेडा ते कोरची, धानोरा,मालेवाडा, वैरागड-गडचिरोली मार्ग बंद झाला आहे. कुरखेडाच्या वार्ड नं 15 मधील 30 घरात पुराचे पाणी घुसले आहे. कोरची-मालेवाडा मार्ग बंद भामरागडात पूर परिस्थिती बिकट, पर्लकोटा नदीला पूर आलापल्ली- भामरागड मार्ग बंद.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे ओबीसी प्रेम पुन्हा उफाळले

0

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून सहा टक्क्यावर करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील १२०० वर अधिक गावांंमध्ये पेसा कायदा लागू झाला आहे. यात अनेक गैरआदिवासी गावेही आहेत. या गावांना वगळावे आदी मागण्यांना घेऊन ओबीसी समाज २०१४ पासून प्रयत्नशील आहेत. भाजपने या प्रश्नावर अनेकदा आश्वासने दिली. परंतु एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आगामी काळात नगर पालिका व पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे ओबीसी मतदारांचा प्रचंड रोष विद्यमान लोकप्रतिनिधींवर आहे. भारतीय जनता पक्षातीलही ओबीसी कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. केवळ अधेमध्ये ओबीसी शिष्टमंडळ मुंबईत नेऊन त्या नेत्यांचे मनोरंजन करण्याचे काम भाजप करीत आहे, असा आरोप आता प्रखरपणे होऊ लागला आहे.

यांचा रोष दाबण्यासाठी ९ सप्टेंबरला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे यांच्या नेतृत्वात भाजपातील ओबीसी सदस्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. पुन्हा ओबीसींच्या प्रश्नाचा कोळसा उगाळण्यात आला व जुनेच आश्वासन देण्यात आले. या आश्वासनाची पूर्तता होण्याची शक्यता तीळमात्र नाही. गडचिरोली जिल्ह्याच्या ओबीसींच्या प्रश्नावर विधानसभा निवडणुकीपासून आतापर्यंत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी ओबीसी शिष्टमंडळासह दोन ते तीन वेळा राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफीयत मांडली होती. मात्र त्यानंतरही ओबीसींना न्याय मिळाला नाही. त्यामुळे ओबीसी जनतेचा आता पूरता विश्वास उडालेला आहे.

नागरिकांनी एलईडी लाईटचा वापर करावा- आ. रहांगडाले

0

तिरोडा , ता.11: आपणास औष्णिक उर्जा ही महाग पडत असून आवश्यकतेऐवढी आपण निर्माण करु शकत नाही. त्यामुळे प्रदूषणही भरपूर होतो. वीज वापरताना महाग पडत असून सौर ऊज्रेचा वापर केल्यास त्यातही एलईडीचा वापर केल्यास प्रकाश भरपूर मिळेल व बिलही भरावे लागणार नाही. नागरिकांनाही एलईडी लाईटच्या वापर करावा, असे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले.विरसी चौकातील हायमास्ट लाईटचे उद््घाटन करताना ते बोलत होते.
उद््घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते, सरपंच पद्मा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने पोलीस पाटील हेमंत नागपुरे, प्रमोद गौतम, प्रफुल टेंभरे, गोपीचंद बावणकर, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊराव कठाने, गजानन फटिंग, बकाराम पटले उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, हे हायमास्ट लाईट आपल्या आमदार निधीतून लावले असून तिरोडा तालुक्यात आठ ठिकाणी लावण्यात आले आहेत. असा हा नाविण्यपूर्ण उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याच विधानसभा क्षेत्रात होत असल्याचे सांगितले. शाळेच्या आवार भिंतीसाठी पाच लाखांचा निधी मंजूर झाल्याचेही सांगितले.
शेतीसाठी पाणी महत्वाचे आहे. खळबंदा तलावात लवकरच पाणी सोडले जाईल तर चोरखमारा व बोदलकसा जलाशयात पाणी सोडण्याचे कार्य टप्पा-२ मध्ये होणार आहे. प्रकाशाच्या बाबतीत प्रथमत: गोला लाईट, ट्यूब लाईट, सीएफएल बल्व आणि आता एलईडी बल्ब आलेत. एलईडीमुळे विद्युत बचत होते. त्यामुळे नागरिकांनी एलईडीचा वापर करावा. शासनाचे पाऊलसुद्धा याकडे आहे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक हंसराज रहांगडाले यांनी मांडले. संचालन नरेश रहांगडाले यांनी केले. आभार घनश्याम पटले यांनी मानले.

सुरेश कदम : गणेशोत्सव शांततेत साजरा करा

0

गोरेगाव , ता.11: तालुक्यातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सभा नुकतीच पंचायत समिती सभागृहात पार पडली. या सभेद्वारे सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी केले.सभेला मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्यासह उपनिरीक्षक श्रीधर खडके, नरेंद्र भड, डिलेश्वर पंधरे उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील ५५ गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. ५ सप्टेंबरपासून स्थापित केलेल्या गणेशाचे विसर्जन १५ सप्टेंबरपर्यंत करावयाचे आहे. १० दिवस विराजमान गणेशोत्सवात शांतता राहावी म्हणून घ्यावयाच्या काळजीबाबत सुरेश कदम यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यावर्षी सहाय्यक धर्मादाय आयुक्तालय यांच्यामार्फत सर्व मंडळांनी तात्पुरत्या १० दिवसांची नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी झालेल्या मंडळांना परवानगी मिळेल. पण नोंदणी न झालेल्या मंडळांना स्वजबाबदारीवर गणेशोत्सव साजरा करावा लागेल. यासाठी रितसर सूचनांचे पालन करून गावातील शांतता भंग होणार नाही. लेखी परवानगी शिवाय वर्गणी गोळा करू नये व रहदारी अडवू नये, मंडप बांधण्यासाठी खासगी व ग्रामपंचायत जागेची लेखी परवानगी द्यावी. गणेश मूर्तीचे आसन मजबूत करावे. पावसापासून संरक्षण करावे, सजावटीमध्ये हॅलोजन व प्रखर उजेड देणारे विद्युत बल्व वापरु नये. उत्सवामध्ये व मिरवणुकीमध्ये करण्यात येणाऱ्या देखाव्याची माहिती पोलीस ठाण्याला देऊनच देखावे सादर करावे. जातीय भावना दु:खवतील असे आक्षेपार्ह गाणे, पोवाडे, पोस्टर्स लावू नये. मंडपाच्या ठिकाणी, विद्युत खांबावर धार्मिक किंवा संघटनेचे झेंडे लावू नये. मद्यपान करून झगडा- भांडण करणाऱ्या व्यक्तीस पोलिसाच्या स्वाधीन करावे. मिरवणुकीत गुलाल उडवू नये. मोठ्या आवाजाचे फटाके फोडू नये. मिरवणुकीच्या वेळी लहान मुलांना वाहनाच्या वरच्या भागावर बसवू नये, असे मार्गदर्शन केले.मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली नावे, मोबाईल क्रमांक देऊन पोलीस विभागाला वेळोवेळी सूचना द्यावे व कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे सांगितले.

मृत्यू झाल्यास सहा लाखांचा मदत निधी द्या: पतसंस्थेच्या अध्यक्षाला निवेदन

0

गोंदिया , ता.11: जिल्ह्यात कार्यरत एक हजार डीसीपीएस शिक्षकांचा अपघाती किंवा आकस्मीक मृत्यू झाल्यास सहा लाखापर्यंत मदत देण्याची मागणी त्या शिक्षकांनी पतसंस्थेचे अध्यक्ष विरेंद्रकुमार कटरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
१ नोव्हेंबर २00५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचारीला नविन अंशदायी पेंशन लागू आहे. सेवेत असताना शिक्षकाचा अपघाती किंवा आकस्मीक मृत्यू झाला तर नविन योजनेत कोणत्याही प्रकारचा लाभ शिक्षकाला नाही.कुटुंब नवृत्ती वेतन, अनुकंपा, उपदान ग्रॅच्युटी अश्या सुविधा पेंशन धारकांना आहेत. मृत्यू झाल्यास डीसीपीएस धारकाचा कुटुंब अडचणीत येतो. आकस्मीक घटनांचे प्रमाण कमी असल्यामुळे पतसंस्थेला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार नाही.
यासंदर्भात अध्यक्ष विरेंद्रकुमार कटरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. चर्चेत मुकेश रहांगडाले, शालीक कठाणे, दत्तात्र्येय बागडे, राज कडव, संदीप सोमवंशी, महेंद्र चव्हाण, सुभाष सोनवाने, जे.डी. म्हशखेत्री, अनमोल उके, मंगला मडावी, संजय उके, धर्मेंद्र नागपुरे, चिंतामन वलथरे, भुमेश्‍वर कटरे, खवासे, डी.सी. रहांगडाले, प्रितम लाडे, राजेंद्र डहाके यांनी सहभाग घेतला होता

जिल्हा सहकारी बोर्डावर १४ संचालक अविरोध

0

गोंदिया : गोंदिया जिल्हा सहकारी बोर्डावर १८ पैकी १४ संचालक अविरोध निवडले गेले. दुसऱ्यांदा या बोर्डावर भाजपचा झेंडा फडकला. भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, यांच्या नेतृत्वात जिल्हा सहकार आघाडी अध्यक्ष प्रा. सुभाष आकरे, दीपक कदम, भाऊराव उके, व्यंकटराव कटरे, अन्ना हरी डोंगरवार, गुमानसिनह उपराडे, रगीश टेंभरे, भैय्यालाल पुस्तोडे, भाऊराव नागमोती, संतोष बिसेन, सुकचंद राऊत, दामोदर नेवारे, मोहीणी निंबार्ते, ललीता भगत तर काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमर वऱ्हाडे, शेषराव गिऱ्हेपुंजे,अनिु राजगीरे, प्रवीमकुमार गहरवार यांचा समावेश आहे.

जनजागृती केल्यानंतरच व्यसनमुक्तीचा कायदा राबविणे शक्य: डॉ.अभय बंग

0

गडचिरोली, ता.10: व्यसनमुक्तीसाठी शासनस्तरावर कडक कायदे करण्यात आले आहेत. मात्र लोकशिक्षणाद्वारे प्रबोधन करुन समाजजागृती केल्यानंतरच त्यासंबंधीचा निर्बंधात्मक कायदा राबविता येईल, असे प्रतिपादन ‘सर्च’चे संचालक डॉ.अभय बंग यांनी  केले. तंबाखू व दारुमूक्त जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा (ता.९) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली, यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहूणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, दंततज्ज्ञ डॉ. कैलास नगराळे उपस्थित होते.

डॉ. बंग पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्हा दारु व तंबाखुमुक्त व्हावा या हेतूने ‘मुक्तिपथ’ हे अभियान जिल्हयात सुरु होत आहे.  तंबाखू  व दारुचा वापर हे  भारतात रोग निर्मितीचे प्रमुख कारण झाले आहे.  त्यामुळे कॅन्सर, बीपी. लकवा, हृदयरोग असे अनेक रोग निर्माण होत आहेत. गडचिरोली जिल्हयात एकूण लोकसंख्येमध्ये ४० ते ६० टक्के लोक दारु किंवा तंबाखूजन्य पदार्थाचा वापर करतात. तंबाखू व दारु विकत घेण्यावर लोकांचा एकूण ३४० कोटी रुपये वार्षिक खर्च होतो. शिवाय आरोग्याचे व आर्थिक नुकसान प्रचंड होत आहे. समस्येचे हे स्वरुप बघता तंबाखू व दारुचा वापर वेगाने कमी करणे हे गडचिरोली जिल्हयाचे आरोग्य रक्षण व आर्थिक विकासासाठी आवश्यक ठरते. यापूर्वीचे अनुभव बघता फक्त बंदी किंवा व्यसनमुक्ती असे एकांगी काम करुन भागणार नाही, तर यासाठी अनेकांगी कार्यक्रमांचा वापर करुन ही समस्या नियंत्रित करण्याचे मुक्तिपथ  या अभियानांतर्गत ठरविले आहे, असेही ते म्हणाले. याकरिता शासनाने पुढाकार घेतला असून राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे.  समाज जागृतीसाठी शासकीय विभाग, मुक्तीपथ, ग्रामसभा आणि प्रसार माध्यमे यांची महत्वाची भूमिका असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी नायक म्हणाले, प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील कर्मचारी व्यसनमुक्त  होण्यासाठी प्रयत्न करावे व त्याची माहिती वेळोवेळी अवगत करावी. कार्यालयातील जे अधिकारी व कर्मचारी संपूर्ण व्यसनमुक्त होऊन समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतील त्यांचा येथोचित सत्कार करुन बक्षीससुध्दा प्रदान करण्याचा मनोदय असल्याचे ते म्हणाले.

एम बी पटेल महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा

0

देवरी (10)- स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आज (ता.10) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रासयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनीता रंगारी या होत्या. प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ता म्हणून डॉ. अभिनंदन पारूमोडे , प्राचार्य डॉ. देवेंद्र बिसेन हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. दरम्यान, भारती टेंभूरकर व घनशाम ऊईके यांच्या चमूने साक्षरतेवर गीत सादर केले.

प्रास्ताविक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय मेश्राम यांनी केले. सूत्रसंचलन आरती मरस्कोल्हे हिने केले. उपस्थितांचे आभार प्रतिक गेडाम याने मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी  सुनील खतोदे, गायत्री गुप्ता, नरेश नेताम, सुबोध देशपांडे, दिलीप सरस्कोल्हे, सुकेशनी रोकडे, शितल बडवाईक, माहेश्वरी मानकर,यशवंत भोवते, अजय दर्रो आदी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी आणि प्राध्यापक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.