मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी उद्या पुण्यात गौप्यस्फोट करणार?

0
9

भंडारा,दि.22ः- मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी पुणे येथे २३ नोव्हेंबरला मोठा गौप्यस्फोट करण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा हेसुद्धा उपस्थित राहतील, अशी माहिती खा. नाना पटोले यांनी भंडारा येथील विर्शामगृहात दिल्याने पुन्हा एकदा राजकीय भुकंपाची चिन्हे दिसू लागली आहेत.
२३ नोव्हेंबर रोजी पुणे येथे एका कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्र माला भाजप नेते यशवंत सिन्हा हे विविध विषयांसह जीएसटीबाबत बोलणार असल्याचे खा. पटोले म्हणाले. परंतु, मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी नेमका काय गौप्यस्फोट होणार आहे, याबाबत अधिक सांगण्याचे त्यांनी टाळले.
केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना पटोले म्हणाले की, ९३ प्रकारच्या कीटकनाशकांवर जागतिक पातळीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, हे बंदी घातलेले कीटकनाशक भारतात सर्रासपणे विकल्या जातात. कीटकनाशक तथा बि-बियाणांमुळे शेतकर्‍यांची फसगत होत असताना सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यासाठी केंद्र सरकारने कायदा करून शेतपिकांची जबाबदारी निश्‍चित करावी. हा कायदा संमत झाल्यास शेतपिकांना चांगला भाव मिळेल व त्याचा फायदा शेतकर्‍यांना होईल.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पाण्याची स्थिती अत्यंत गंभीर आहे. येत्या उन्हाळ्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण होणार असल्याने आतापासूनच पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. जलयुक्त शिवार योजनेतूनही फारसे काही समाधान झाले नाही. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील तलाव, बोड्यांचे खोलीकरण करण्यात यावे. तेव्हाच पाण्याचा साठा निर्माण होईल.
भंडारा शहराजवळून बारमाही वैनगंगा नदी वाहत असताना येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. भंडारा नगर परिषदेने पिण्याच्या पाण्याबाबतचा प्रस्ताव अद्याप शासनाला पाठविला नाही. नागनदीचे दूषित पाणी वैनगंगेत येत असल्याने याविरोधात कायदेशीर लढाई लढण्यात येईल, असेही त्यांनी पुढे सांगितले.