लोकसभा निवडणूक काळात सर्व नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

0
14

वाशिम, दि. ०५ :  आगामी लोकसभा सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होवू शकते. त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर तिची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच या काळात निवडणूक विषयक कामकाज शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या. वाकाटक सभागृहात आज झालेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराम वानखेडे, प्रभारी पोलीस उपाधीक्षक (गृह) अनिल ठाकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. हरण, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व्यं. व. जोशी, अपर जिल्हा कोषागार अधिकारी एस. टी. गाभणे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी युसुफ शेख यांच्यासह निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध समित्या व पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये एक नोडल अधिकारी तसेच त्यांच्या सहाय्यासाठी इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ तसेच वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, खर्चाचा हिशोब, कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आदी बाबींना निवडणूक काळात सर्वोच्च प्राधान्य राहणार आहे. त्याचबरोबर स्वीप कार्यक्रमाच्या सहाय्याने जिल्ह्यातील मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करून मतदानाची टक्केवारी वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

मनुष्यबळ व्यवस्थापन, ईव्हीएम व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन, स्टेशनरी व मतदान साहित्य व्यवस्थापन, निवडणूक खर्च संनियंत्रण, प्रसारमध्यम आणि संदेशवहन, स्वीप, दिव्यांग मतदार, मतदान केंद्रांवरील किमान मुलभूत सुविधा, संगणकीकरण आदी बाबींसाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच निवडणूक पूर्वतयारीच्या अनुषंगाने आवश्यक सूचना दिल्या.