‘जो पाजेल नवऱ्याला दारू, त्याला नक्कीच पाडू!’

0
23

गडचिरोली,दि.0५ : लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी ‘मुक्तिपथ‘ अभियानाच्या माध्यमातून दारूमुक्त निवडणुकीचा संकल्प केला असून मतदारांना प्रभावित करण्यासाठी दारूचा वापर न करण्याचा निर्धार जाहीर केला आहे.दरम्यान प्रशासकीय यंत्रणेने निवडणुकीत दारूचा गैरवापर थांबविण्यासाठी कारवाई सुरू केली असून जागोजागी वाहनांची तपासणी, दारूची जप्ती व वारंवार दारूचा गुन्हा करणाऱ्यांना तडीपार केले जात आहे. जनतेने, स्वयंसेवी संस्था, सामाजिक चळवळी आणि जागरूक नागरिकांनी पुढाकार घेऊन जो उमेदवार मतदारांना दारू पाजेल त्यावर बहिष्कार टाकावा. हा एक प्रकारे जनतेचा जाहीरनामा बनावा, असे आवाहन डॉ. अभय बंग यांनी केले आहे.
या मतदारसंघात एकूण ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या निवडणुकीसाठी गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील प्रमुख उमेदवार अशोक नेते(भाजप), डॉ. नामदेव उसेंडी(कॉंग्रेस), डॉ. रमेश गजबे(वंचित बहुजन आघाडी), देवराव नन्नावरे(आंबेडकराइट पार्टी), हरिश्चंद्र मंगाम(बसपा) या सर्वांनी लिखित रुपात आपला हा संकल्प ‘मुक्तिपथ’च्या स्वाधीन केला आहे. तो मुक्तिपथ तर्फे जाहीर करण्यात आला.

मुक्तिपथच्या आवाहनातून अनेक ठिकाणच्या महिलांनी दारूमुक्त निवडणुकीला प्रतिसाद देत ‘जो पाजेल नवऱ्याला दारू, त्याला नक्कीच पाडू‘ असे फलक झळकविले आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांनीही याचा धसका घेत मी व माझा पक्ष निवडणुकीत दारूचा वापर करणार नाही, असे लिहून दिले.गडचिरोलीतील सहाशे दारूमुक्त गावे आणि दारू बंद ठेवण्यासाठी लढणाऱ्या स्त्रियांच्या मागणीला राजकीय नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘सर्च’चे संचालक व ‘मुक्तिपथ’चे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी सर्व उमेदवारांना धन्यवाद देत ‘दारूमुक्त निवडणूक’ या अभियानामुळे निवडणुकीत बेकायदा दारूचा वापर व उमेदवाराचा खर्च कमी होईल. सोबतच मतदार पूर्ण शुद्धीत आपल्या विवेकाने मतदान करेल. हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे, असे ते म्हणाले.