36.9 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 5656

कार्यमुक्तीचे आदेश निघाले; मात्र कार्यमुक्ती कधी

0

गोंदिया,berartimes.com दि.21-गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी डी.टी.खोब्रागडे यांच्या न्यायालयीन व इतर प्रकरणाच्या चौकशीतील आदेशाला अधिन राहून अकार्यकारी पदावर सालेकसा किंवा आमगाव आमगाव तालुक्यात विभागीय आयुक्ताच्या पत्रानुसार मंजुरी प्रदान करण्यात आली होती.परंतु जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पत्राकडे दुर्लक्ष करीत जागा रिक्त नसल्याचे बाब समोर करीत खोब्रागडे यांची प्राथमिक शिक्षण विभागात अकार्यकारी पदावर सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून नेमणुक केली होती.परंतु गेल्या काही दिवसात खोब्रागडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे आणि वृत्तपत्रातील बातम्यामुळे त्यांना सालेकसा पंचायत समिती येथे रिक्त असलेल्या सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदावर अकार्यकारी म्हणून पुढील आदेशापर्यंत पदस्थापना करण्यात येत असल्याचे आदेश 15 सप्टेंबर रोजी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयंवत पाडवी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत.परंतु खोब्रागडे हे अद्यापही शिक्षण विभागातून कार्यमुक्त झाले नसल्याचे वृत्त समोर आले आहे.विशेष म्हणजे या आदेशात स्पष्टपणे 15 सप्टेबंरच्या मध्यानंनंतर त्यांना  नवीन पदस्थापनेच्या जागी पदभार स्विकारण्यासाठी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचा उल्लेख केला गेला आहे,तरीही या आदेशाला डावलत ते अद्यापही शिक्षण विभागात कार्यरत आहेत.दरम्यान प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना बेरार टाईम्सच्या प्रतिनिधीने विचारणा केली असता त्यांनी जोपर्यंत त्यांच्याजागेवर पर्यायी व्यक्ती येत नाही,तोपर्यंत ते कार्यमुक्त होणार नसल्याचे सांगितले.

पंकजा मुंडे भुजबळांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

0

विशेष प्रतिनिधी

मुंबई,berartimes.com दि. 21-: राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची जेजे हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. तब्येतीची विचारपूस केली. सत्ताधारी पक्षाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात एकीकडे मराठा मोर्चाने महाराष्ट्र ढवळून निघाले. तर दुसरीकडे दोन ओबीसी नेत्यांच्या भेटीमुळे राजकारणाच्या सारीपाटावर खळबळ उडालीये. मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आर्थर रोड जेलमध्ये न्यायलयीन कोठडीत आहेत. मागील आठवड्यात शनिवारी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज पंकजा मुंडे पालघर दौ•यावर जाण्याच्या आधी थेट जेजे हॉस्पिटलमध्ये जाऊन भुजबळांची भेट घेतली.

ही भेट राजकीय होती ही कौटुंबिक ? या प्रश्नाभोवती राजकीय चर्चांना उधाण आले आहे. छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे हे ओबीसी समाजाचे मोठे नेते होते. हे दोन्ही नेते राजकीय विरोधक असले तरी ओबीसी प्रश्नावर एकत्र होते. राज्यात एकीकडे मराठा मोर्च्याने विराट रुपधारण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंच्या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

माओवाद्यांचे १० व ११ ऑक्टोबरला देशव्यापी बंदचे आवाहन

0
गडचिरोली,berartimes.com दि.२१: देशातील बुद्धीजीवी वर्गाला मानसिक व शारीरिक त्रास देऊन मानवाधिकाराचे उल्लंघन करणे, महिलांवरील अत्याचार, सरकारचे साम्राज्यवादी व भांडवलवाद्यांना पोषक असलेले धोरण व ऑपरेशन ग्रीन हंटची आक्रमक भूमिका या विरोधात माओवाद्यांच्या केंद्रीय कमिटीने ५ ते ११ ऑक्टोबरदरम्यान देशव्यापी विरोध सप्ताह व १० आणि ११ ऑक्टोबरदरम्यान देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे.या विरोधात ५ ते ११ ऑक्टोबरदरम्यान देशव्यापी विरोध सप्ताह व १० आणि ११ ऑक्टोबरदरम्यान देशव्यापी बंद पुकारण्यात आल्याचे माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रवक्ता अभय याने म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिबंधीत माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा केंद्रीय प्रवक्ता अभय याने पत्रक जारी केले आहे. पत्रकात अभयने म्हटले आहे की, सरकार देशभरातील माओवादी समर्थक असलेल्या बुद्धीजीवींना मानसिक व शारीरिक त्रास देत आहे. मोदी सरकार आल्यापासून बुद्धीजीवी व महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. विशेष म्हणजे, माओवादी असलेल्या भागात सरकार ऑपरेशन ग्रीन हंटच्या नावाखाली युद्ध झेडत असून, हवाई हल्ले करण्याची योजना आखत आहे, असा आरोपही नक्षलप्रवक्ता अभय याने केला आहे. माओवाद्यांचे निर्मुलन करण्यासाठी सरकारने दंडकारण्यात ‘मिशन २०१६’, बिहार, झारखंडमध्ये ‘ऑपरेशन फिनिश व ऑपरेशन महादेव’,’ऑपरेशन ब्रेक’, आंध्रप्रदेश-ओडिसा सीमेवर ‘ऑपरेशन ब्लू मून’, झारखंडमध्ये ‘ऑपरेशन विश्वास’ सुरु केले असून, मोठ्या प्रमाणावर सैनिक व अर्धसैनिक दलांना तैनात करण्यात येत आहे. या जवांनाकडून सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप माओवादी पार्टीचा प्रवक्ता अभय याने केला आहे.

विशेष म्हणजे, आदिवासी भागातील जनतेने जल, जंगल व जमिनीचे जतन केले आहे. परंतु सरकार या तिन्ही बाबी साम्राज्यवादी व भांडवलवाद्यांच्या ताब्यात देत आहे. नैसर्गिक संपत्ती उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी सरकार राजकीय नेते, प्रशासन व पोलिसांनाही कामाला लावत असून, ठिकठिकाणी हेलिपॅड तयार करुन हवाई हल्ल्यांद्वारे माओवाद्यांना नष्ट करु इच्छित आहे, असा गंभीर आरोपही अभयने केला आहे.

रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प बंद केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय

0
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. २१ – मागच्या ९२ वर्षांपासून सुरु असलेली रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा मोडीत निघाली आहे. पुढच्या आर्थिक वर्षापासून स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार नाही. बुधवारी सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीत अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पाचे विलीनीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली.
त्यामुळे पुढच्यावर्षीपासून १९२४ पासून सुरु असलेली रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा बंद होणार आहे. यापुढे फक्त एकच अर्थसंकल्प असेल असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. अर्थसंकल्प एक झाला असला तरी रेल्वेची स्वायत्तता कायम रहाणार असल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. रेल्वे अर्थसंकल्पाचा अनेक मंत्र्यांनी स्वत:ची प्रतिमा चमकवण्यासाठी वापर केला.
रेल्वे अर्थसंकल्प सादर होत असताना त्यात राजकीय आणि प्रादेशिक छाप दिसून यायची. रेल्वेच्या स्वतंत्र अर्थसंकल्पाऐवजी केंद्रीय अर्थसंकल्पातच समावेश करावा, अशी मागणी खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. निती आयोगाच्या दोन सदस्यांनीही रेल्वे अर्थसंकल्प बंद करण्याची शिफारस केली होती.

१८७ गावात ५८४ शाळाबाह्य व बालकामगार मुले

0

गोंदिया,berartimes.com दि.२१ : श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया अंतर्गत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील १८७ गावात ९ ते १३ आणि १४ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य मुला-मुलींचे सर्वेक्षण जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या नियंत्रणाखाली संबंधित गावातील आशा सेविका व नेहरु युवा केंद्रातील समन्वयक यांच्यामार्फत नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात एकूण ५८४ बाल कामगार व शाळाबाह्य मुले आढळून आली.
या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील १८७ गावांची निवड करण्यात आली होती. यात ९ ते १३ आणि १४ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य मुला-मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३५ गावे, तिरोडा तालुक्यातील २३ गावे, आमगाव तालुक्यातील २१ गावे, सालेकसा तालुक्यातील ३१ गावे, देवरी तालुक्यातील २० गावे, गोरेगाव तालुका- १९ गावे व सडक/अर्जुनी तालुका- १६ गावे, तर अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील २२ गावांचा समावेश करण्यात आला. या सर्वेक्षणात ९ ते १३ वयोगटातील २३२ आणि १४ ते १८ वयोगटातील ३५२ असे एकूण ५८४ शाळाबाह्य व बाल कामगार मुले सर्वेक्षणादरम्यान आढळून आली. त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता श्रम रोजगार मंत्रालयातर्फे ७ विशेष प्रशिक्षण केंद्र लवकरच उघडण्याबाबत अहवाल पाठविण्यात आला आहे.

जलयुक्त शिवार योजना : आमदारांनी घेतला आढावा

0

तिरोडा दि.21: गतिमान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमी खर्चामध्ये व शेतकर्‍यांना वैयक्तिक लाभ तसेच पाणी टंचाई दूर करण्याच्या दृष्टीने व जलस्तर वाढविण्याकरिता स्थानिक तहसील कार्यालय तिरोडा येथे जलयुक्त शिवार योजनेची सुरुवात केली. तिरोडा तालुक्यातील या कामांचा आढावा आमदार विजय रहांगडाले यांनी घेतला. यात पंचायत समितीमार्फत १३ कामे घेण्यात आली असून ८0 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.
सदर कामांची प्रशंसा महाराष्ट्रात तर नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये होत आहे. याच जलयुक्त शिवार योजनेतून आ. विजय रहांगडाले यांनी सन २0१६-१७ जलयुक्त शिवार योजनेत असलेले गाव सोनेगाव येथे चार तलावांना जोडून एक मोठा तलाव बनविण्याकरिता समाविष्ट केले आहे. या कामाची सुरुवात होणार असून या तलावाच्या माध्यमाने ५00 हेक्टर शेतजमीन सिंचित होणार असून मोठा जलसाठा निर्माण होणार आहे.
या विषयी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली असता आमदार विजय रहांगडाले यांचे प्रशंसा करण्यात आली. हे एक जलयुक्त शिवारमधील ड्रीम प्रोजेक्ट ठरणार आहे. तसेच तिरोडा तालुका हा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेत प्रथम क्रमांकावर असून या योजनेमध्ये पंचायत समितीमार्फत १३ कामे घेण्यात आली असून ८0 टक्के कामे पूर्ण झालेली आहेत.
कृषी विभागामार्फत २१५ कामे, वनविभागामार्फत आठ कामे, लघूसिंचन पाच कामे, ग्रामीण पाणीपुरवठामार्फत ११ कामे व इतर तलाव खोलीकरणाची कामे सीएसआर निधीच्या माध्यमाने झालेली आहेत. सन २0१६-१७ ची उर्वरित कामे यावर्षी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आढावा बैठकीमध्ये तिरोडा उपविभागाचे उपविभागीय अधिकरी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार रविंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी मानकर, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, वनपरिक्षेत्राधिकारी विजय कदम व इतर संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. तसेच धडक योजनेमध्ये जिल्ह्यात पाच हजार विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट असून या योजनेतून सर्वात जास्त विहिरी तिरोडा क्षेत्रात व्हाव्यात, असे निर्देशसुद्धा अधिकार्‍यांना दिले. शेतकर्‍यांना धडक योजनेच्या विहिरींचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले.

शिक्षकांकडून शासन निर्णयाची होळी

0

भंडारा ,berartimes.com दि.21: राज्य शासनाने काही दिवसापूर्वी विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान देण्याचे घोषित केले. हे अनुदान शंभर टक्के घोषित करावे या मागणीसाठी आज भंडारा जिल्हा विनाअनुदानित कृती समितीने जिल्हा परिषद येथे राज्य शासनाचा अध्यादेश जाळून निषेध केला.

मागील अनेक वर्षांपासून खासगी संस्था चालकांच्या शैक्षणिक संस्थामध्ये शेकडो शिक्षक रोजी-रोटी मिळेल या अपेक्षेने शिक्षक म्हणून तुटपूंजा मानधनावर काम करीत आहे. मात्र वर्षामागून वर्ष उलटून जात असतानाही या शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. यासाठी शिक्षक संघटना, संस्था चालकांनी शासन दरबारी अनेकदा रेटा मारला. राज्य शासनाने १९ सप्टेंबरला पारित केलेल्या निर्णया जाचक अटी असल्याचा आरोप या कृती समितीने केला आहे. २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय चुकीचा असून तो शिक्षकांसाठी कर्दनकाळ असल्याचा आरोपही समितीकडून केल्या जात आहे. २० टक्के अनुदानाऐवजी सर्वच शाळांना सरसकट १०० टक्के अनुदान घोषित करून शिक्षकांची अवहेलना थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान (कायम) विनाअनुदानित कृती समितीचे अध्यक्ष प्रविण गजभिये, सचिव मुकूंद पारधी यांच्यासह संतप्त शिक्षकांनी २० टक्के अनुदानाचा शासन निर्णय जाळून निषेध केला.

कृषीसेवक सरळ सेवा परीक्षा रद्द करा

0

भंडारा ,berartimes.com दि.21: कृषी सेवक सरळ सेवा पदभरती परिक्षेच्या निकालात राज्यातील सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर सुध्दा अन्याय झाल्याचे स्पष्ट दिसून आल्यानंतर पदवीधर महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शहर अध्यक्ष पराग भुतांगे व राहुल शामकुंवर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी चौधरी यांच्या मार्फत निवेदन पाठवून सदर परिक्षा रद्द करुन पुर्नपरिक्षा घ्यावी अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले.राज्यात कृषी सेवकांच्या ७३० पदांसाठी परिक्षा ६ आॅगस्ट २०१६ रोजी घेण्यात आली. या परिक्षेत ६५ हजारावर विद्यार्थ्यांनी दखल केले होते. त्यापैकी ५७ हजार विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली या परिक्षेचा निकाल ६ सप्टेंबर २०१६ रोजी जाहिर करण्यात आला.

पंरतु सदर निवड प्रक्रियेमध्ये घोळ आढळून आलेत. विशाल उखा पाटील (अर्ज क्र. १३६६४) हा विद्यार्थी औरंगाबाद विभागातून ओबीसी प्रवर्गातून १८२ गुण प्राप्त करीत ह्याची निवड ओपन जनरल १३ मध्ये झाली. हाच विद्यार्थी ठाणे विभागातून (अर्ज क्र. ४८१७) ओबीसी प्रवर्गातून १८२ गुण प्राप्त करीत ह्याची निवड ओपन जनरल ९ मध्ये झाली. पुणे विभागातून हरिश कैलास देवरे व नरेश कैलास देवरे भाऊ उत्तीर्ण झाले. या दोन्ही भावाना १८३ गुण प्राप्त झाले.

विशेष म्हणजे या दोन भावाच्या वयात केवळ सहा महिन्याचे अंतर आहे. औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८७ गुण त्याखालोखाल १८४ गुण प्राप्त केलेले पाच विद्यार्थी, १८३ गुण प्राप्त केलेले सहा विद्यार्थी, १८२ गुण प्राप्त केलेले तीन विद्यार्थी व त्यानंतर थेट १३७ गुण प्राप्त केलेला परिक्षार्थी. कोल्हापुर विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८२ गुण त्याखालोखाल १८१ गुण प्राप्त केलेले चार विद्यार्थी व त्यानंतर थेट १५० गुण प्राप्त केलेला परिक्षार्थी. अमरावती विभागात सर्वसाधारण गटात फक्त १२४ गुणांवर प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे. नागपूर विभागात १६५ ते १८२ गुणांच्या दरम्यान १६ मुले आहेत व १४८ ते १६२ गुणांच्या दरम्यान एकही उमेदवार नाही व नंतर थेट १४८ गुणांच्या खाली इतर परिक्षार्थी आहेत.

मेरिट लिस्ट व प्रतिक्षा यादीतील गुणांमध्ये मोठी तफावत आहे. निवड यादीत ओपन प्रवर्गातील पुरुष निवड यादी ९२ गुणांवर तसेच महिला निवड यादी ९१ गुणावंर झाली. याच्या तुलनेत ओबीसी महिला यादी ११३ व ओबीसी पुरुष यादी १२९ गुणांवर अंतिम निवड करण्यात आली. ओबीसी उमेदवारांना जास्त गुण असूनसुध्दा डावलण्यात आल्याचे स्पष्ट होते व ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड कमी गुणांवर सुध्दा करण्यात आली. सर्वसाधारण गटात गुणवत्ता यादीत १८६ गुणांचा विद्यार्थी पहिला आला आहे. परंतु प्रश्न पत्रिकेचे अवघड स्वरुप बघता मेरिटचे आकडे संशयास्पद आहेत. करिता सद विद्यार्थ्यांची परिक्षा केंद्रावरील व्हिडीओ रेकॉर्डींग तपासण्यात यावी जेणेकरुन कुणी याना मदत तर करीत किंवा अत्याधुनिक उपकरणाचे वापर तर करीत नाहीत तसेच सदर प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी व त्यात पदवीधर महासंघ भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे मत सुध्दा नोंदविण्यात यावे. परीक्षा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पदवीधर महासंघाचे शहर अध्यक्ष पराग भुतांगे, राहुल शामकुवर, जाबीर मालाधारी, शितल भुरे, प्रवीण अंबादे, सुदेश रामटेके, जितेंद्र मेश्राम, प्रफुल्ल कोटांगले, ब्रजेश खोब्रागडे, मयूर रामटेके, नितीन कांबळे, प्रमोद धुर्वे, रवी समरीत, संदीप वंजारी, प्रफुल्ल भोयर यांनी दिला आहे.

रायुकाँने जाळला पाकिस्तानचा झेंडा

0

गोंदिया दि.21: काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर झालेल्या हल्यात १८ जवान शहीद झाले असून या हल्याच्या निषेधार्थ येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तरूणांनी जयस्तंभ चौकात एकत्र येवून मंगळवारी (दि.२0) पालिस्तानचा झेंडा जाळला.
येथील जयस्तंभ चौकात तरूणांनी सर्वप्रथम मेणबत्ती जाळून तसेच दोन मिनिटांचे मौन धारण करून शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित केली. त्यानंतर पाकिस्तान विरोधी नारेबाजी करीत पाकिस्तानचा झेंडा जाळला.
याप्रसंगी रौनक ठाकूर, आकाश नेवारे, राजेश काळसर्पे, सौरभ सिंग, अक्षय सिंगनधुपे, रोहीत कोहरे, दर्पण कापगते, परेश राणा, शँकी उमरकर, विकास खोटेले, समीर येसनसुरे, तपन केशवानी, टोलू नेवारे, हितेश दानी, राजकुमार लिल्हारे, शुभम नागपूरे, भूपेश गायधने, दिनेश लिल्हारे, अजय लिल्हारे, गंगाधर ढेकवार, शंकर मंडेले, रोहीत मेंढे, शुभम गंगवंशी, परिल धोटे, निलेश बहेकार, दिलप्रीत वोहरा व अन्य नागरिक उपस्थित होते.

पातागुडम पोलिसांनी जप्त केला नक्षल्यांचा शस्त्रसाठा

0

गडचिरोली, दि.२०: सिरोंचा तालुक्यातील पातागुडम पोलिस मदत केंद्रांतर्गत पेडलाया जंगलातून पोलिसांनी काल नक्षल्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला.काल पातागुडम व देचलीपेठा येथील क्यूआरटी पथकाचे जवान संयुक्तरित्या नक्षलशोध मोहीम राबवीत असताना त्यांना पेंडलाया जंगलात ४ भरमार बंदुका व १४ जीवंत काडतुसे आढळून आली. अज्ञात नक्षल्यांविरुद्ध असरअली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.