30.9 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 5672

जालन्यात भाजप आमदाराच्या धमकीने पोलिस निरीक्षकाचा आत्महत्येचा इशारा

0

विशेष प्रतिनिधी
जालना,दि.7 :महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून पोलीसावर होत असलेल्या हल्यामुळे पोलीस कर्मचारी चांगलेच संतापले असून असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.विलास शिंदे यांच्या मृत्यूचे प्रकरण शांत होत नाही,तोच जालन्यात भाजप आमदाराच्या अररेरावीला कंटाळून बदनापूरच्या पोलिस निरीक्षक विद्यानंत काळे यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्याचा एसएमएस थेट पोलिस अधीक्षकांना पाठविल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.या घटनेमुळे पोलीस महासंचालकानी त्वरीत चौकशीचे आदेश दिले असून तीन दिवसापासून बेपत्ता असलेले काळेंचा आज शोध लागलेला आहे.

2 ऑगस्टला गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना कलम 68 अंतर्गत गुलाल विकण्यास पोलिसांनी बंदी घातली. व्यापाऱ्यांनी याची तक्रार नारायण कुचेंकडे केली. यानंतर कुचेंनी विद्यानंद काळे यांना फोन करुन अर्वाच्य शिवीगाळ केली आणि धमकीही दिली.त्यामुळे 3 सप्टेबरला विद्यानंद काळेंनी एसपींना मेसेज करुन आपले फोन बंद केले आणि कुटुंबासह घर सोडून निघून गेले. गेले तीन दिवस जालना पोलिस विद्यानंद काळेंचा शोध घेत होते.

आदरणीय, पोलिस अधीक्षक

मी विद्यानंद काळे. सध्या बदनापूर पोलीस ठाण्यात पोस्टिंगला आहे. पण मी इथे आल्यापासूनच भाजप आमदार नारायण कुचे कार्यालयीन कामात अडथळे आणतात.त्यांचं ऐकलं नाही तर धमकावतात. त्यांच्या अपमानास्पद वागणुकीच्या सगळ्या क्लिप्स आणि स्टेशन डायरीच्या नोंदी माझ्याकडे आहेत.याआधीही नारायण कुचे यांच्या तक्रारी करुन काहीही झालं नाही. ही व्यवस्था पोलिसांचं संरक्षण करण्यास कमजोर आणि कुचकामी आहे.
त्यामुळे मी माझ्या कुटुंबासह आत्महत्या करण्याचा विचार करतोय. कुचेंविरोधातील सगळे पुरावे मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयास पाठवत आहे

– विद्यानंद काळे

प्रफुल्ल गुडधे पाटील : पक्षांतर्गत हेवेदावे विसरुन संघटित व्हा!

0

भंडारा : आगामी भंडारा नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून आणायचे आहे. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असलेले मतभेद दूर झाले पाहिजे. सर्वांनी पक्षासाठी एकत्र येवून निवडणूक लढायची आहे. कोणत्याही भुलथापांना न पडता नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज राहा असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी व्यक्त केले.
भंडारा शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीची कार्यकर्ता सभा मुस्लिम लायब्ररी सभागृहात रविवारला पार पडली. यावेळी ते बोलत होते. भंडारा नगरपरिषदेच्या निवडणुकीतून ही सभा आयोजित केल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले होते.या बैठकीसाठी माजी आमदार आनंदराव वंजारी, विधानसभा प्रभारी मुजीब पठाण, काँग्रेस कमेटी सचिव डॉ.आसावरी देवतळे, महासचिव जिया पटेल, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजकुमार मेश्राम, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्षअनिक जमा पटेल, वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.विनोद भोयर, जिल्हा महासचिव मनोज बागडे, नगरपरिषद पक्ष नेता शमीम शेख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी आनंदराव वंजारी यांनी नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वॉर्डनिहाय पदाधिकार्‍यांच्या कमिट्या तयार करून पक्ष संघटन मजबूत करावे, निवडणूक प्रक्रियेदरम्यान पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी काम करावे असे प्रतिपादन केले.

अपकार्यकारी खोब्रागडेवर शिक्षणाधिकार्याची मेहरबानी का-परशुरामकर

0

गोंदिया,दि.7-जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यासह राष्ट्रवादी व भाजपच्या सदस्यांनी शिक्षण सभापती पी.जी.कटरे व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या कार्यप्रणालीवर चांगलीच नाराजी नोंदवली.तर तिरोडा पंचायत समितीमध्ये कार्यरत अधिक्षक दिवाकर खोब्रागडे यांच्यावर संगणक चोरीचा गुन्हा दाखल असताना आणि विभागीय आयुक्त नागपूर यांनी त्यांना निलबंन काळात अपकार्यकारी दर्जा देत देवरी, सालेकसा किंवा आमगाव येथे पाठविण्याचे आदेश दिलेले असताना शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी मात्र त्यांना मुख्यालयात कुठल्या आधारावर ठेवल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी उपस्थित केला.
परशुरामकर यांनी शिक्षण विभागातील गोंधळ प्रकार समोरच आणला.आयुक्तांनी अपकार्यकारी आदेश दिलेल्या व्यक्तीला कुठल्याही फाईलवर स्वाक्षरी करण्याचे अधिकार नसतात परंतु खोब्रागडे यांनी अनेक फाईलीवर शिक्षण विभागात स्वाक्षरी करुन आयुक्तांच्या आदेशालाही हरताळ फासले आहे.खोब्रागडे हे कुणाच्या बळावर मुख्यालयात काम करीत आहेत.त्या अधिकार्याचीही चौकशी का करण्यात येऊ नये अशा मुद्दा उपस्थित करुन सभागृहातील चर्चैचा सुरच पलटविला.शिक्षण ,आरोग्य व बांधकाम विभागातील कामाबाबत स्थायी समितीच्या बैठकीत पदाधिकारी वगळता सर्व सदस्य एकसुरात बोलत राहिल्याने पदाधिकार्यांची चांगलीच ताराबंळ उडाली होती. चर्चेमध्ये रमेश अंबुले, उषा सहारे, राजलक्ष्मी तुरकर, अलफाब पठान, रजनी कुंभरे, सुरेश हर्षे, शोभेलाल कटरे यांनी चर्चेत भाग घेतला.

गोंदिया रेल्वे स्थानकात मेडिकल व्हॅन

0

berartimes.com गोंदिया दि.7-: वाढत्या रेल्वे ट्रॅक संरचनेमुळे रेल्वे लाईन्सची दुरूस्ती व देखरेख ठेवण्यासाठी प्रशासनाद्वारे सतत काम केले जात आहे. अपघातांमुळे वेळोवेळी जीवित व वित्तहानीच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाद्वारे युद्धपातळीवर कामे केली जात आहेत. या कार्यांना योग्य रूप देण्यासाठी आधुनिक यंत्रांची गरज म्हणून गोंदिया स्थानकात सेल्फ प्रोपेल्ड अँक्सिडेंट रिलिफ ट्रेन (एसपीएआरटी) उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिला अपघात रिलिफ मेडीकल व्हॅनसुद्धा म्हटले जाते.
सततचे वाढते रेल्वे ट्राफीक व मोठय़ा ट्रॅक संरचनेमुळे रेल्वे लाईन्सच्या दुरूस्तीसाठी प्रशासन सतत काम करीत आहे. तसेच ब्रेकडाऊनमुळे रेल्वे परिचालन बाधित झाल्यास प्रशासनाद्वारे सतत प्रयत्न करून ती अडचण दूर केली जाते. मात्र अनपेक्षित अपघाताच्या वेळी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सदर अपघात रिलिफ ट्रेन (मेडिकल व्हॅन) उपलब्ध राहणार आहे.
सदर व्हॅनमध्ये जखमी प्रवाशांच्या देखभालीसाठी एक लहान ऑपरेशन थिएटर आहे. त्यात प्राथमिक उपचार व छोटे ऑपरेशन केले जाऊ शकतात. या व्हॅनमध्ये आवश्यक औषधी व जवळपास १२ प्रवाशांसाठी बेडची व्यवस्था आहे. अपघातादरम्यान एक डॉक्टर व एक सहायक उपस्थित राहतात. ते पीडितांच्या आवश्यकतेनुसार उपचार करतात.
वेळोवेळी उपलब्ध अपघात रिलीफ उपकरणांची तपासणी मंडळाच्या उच्च अधिकार्‍यांकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे व्हॅन अपडेट राहण्यास मदत होते. मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी गोंदिया स्थानकात उपलब्ध सदर ट्रेनचे निरीक्षक केले व कार्यप्रणालीची पाहणी केली.

एलआयसीच्या मालमत्तेत 10 हजार कोटींची वाढ

0

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अर्थात एलआयसीच्या मालमत्तेत रु.10,000 कोटींची वाढ झाली आहे. वाहन कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात एलआयसीच्या मालमत्तेत रु. दहा हजार कोटींची भर पडली आहे. एलआयसीने मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, आणि हीरो मोटोकॉर्प या आणि बजाज ऑटो या वाहन कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. 1 एप्रिल 2016 पासून आतापर्यंत केलेल्या गुंतवणुकीत 32 टक्के म्हणजेच रु.42000 कोटींची वाढ नोंदवण्यात आली आहे.

एलआयसीने मार्च 2016 मध्ये शेअर बाजारात रु.5,95,389 कोटींची गुंतवणूक केली होती. भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शिवाय भारतभर चांगल्या मॉन्सूनमुळे उत्साहाचे वातावरण आहे. परिणामी शेअर बाजारात देखील तेजीचे वातावरण कायम आहे.
एलआयसीने वाहन कंपन्यांमध्ये गुंतवलेल्या कंपन्यांपैकी टाटा मोटर्स सोडता महिंद्रा अँड महिंद्रा, आणि हीरो मोटोकॉर्प या आणि बजाज ऑटो या चारही कंपन्यांचे शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी पातळीजवळ पोचले आहे.

आदिवासींच्या विकासाला बाधा ठरणाऱ्या शुक्राचार्यांवर कारवाई करा

0

काँग्रेसचे शासनाला निवेदनः तीव्र आंदोलनाचा इशारा

देवरी(ता.6)- आदिवासींच्या उत्थानासाठी असलेल्या न्यूक्लिअस बजेटचा वापर करण्यास देवरीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नेहमीच उदासीनता दाखवत आले आहे. परिणामी, या योजनेतील निधी परत जात असल्याने आदिवासी आजही ‘जैसे थे‘च्याच स्थितीत आहेत. त्यामुळे आदिवासींच्या विकासात शुक्राचार्य बनलेल्या या दोषी अधिकाऱ्यांचे थेट निलंबन करण्याच्या मागणीला घेऊन गोंदिया जिल्हा काँग्रेसच्या वतीने शासनाला देवरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने आज मंगळवारी (ता.६) हे निवेदन नायब तहसीलदार यांनी स्वीकारले.
निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हा महासचिव सहेसराम कोरेटे यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य माधुरी कुंभरे, नगरपंचायतीचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, तालुका उपाध्यक्ष चैनqसग मडावी, सोनू नेताम, धनपत भोयर, बळिराम कोटवार, गणेश भेलावे, सुदाम पुराम, मोहन कुंभरे, टी.डी. वाघमारे,इक्बाल शेख, ओमराज बहेकार आदी पदाधिकारी होते.
मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्र्यांच्या नावे दिलेल्या निवदेनात काँग्रेसने म्हटले आहे की, शासनाच्या अंदाज पत्रकात ज्या योजनांसाठी तरतूद केली नसेल अशा अभिनव स्वरूपाच्या महत्त्वपूर्ण व तांत्रिक स्वरूपाच्या योजना स्थानिक पातळीवर राबविण्यासाठी न्यूक्लिअस बजेटची तरतूद शासनाने केली आहे. त्या अंतर्गत गेल्या वित्तीय वर्षात देवरीच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाला ८४ लाख ६९ हजार एवढा निधी देण्यात आला होता. या निधीतून आदिवासींचे उत्पन्न वाढविणे, कौशल्य प्रशिक्षण तसेच साधन संपत्ती विकासावर हा निधी खर्च करणे अपेक्षित असताना आदिवासी विकासावर मार्च अखेर केवळ १० लाख ९६ हजार एवढा तुटपुंजा निधी खर्च करण्यात आला. एवढेच नाही तर आदिवासी विकासाच्या अनेक योजना राबविण्यास सदर प्रकल्प कार्यालय नेहमी उदासीनता दाखवत आले आहे. परिणामी, आदिवासी विकासाची गाडीने या भागात अद्यापही पाहिजे तसा वेग घेतला नाही. आदिवासींना भूलथापा देत त्यांच्या मतांवर सत्तेत आलेल्या लोकप्रतिनिधींचा या अधिकाऱ्यांवर वचक नाही. या भागातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी हे आदिवासी समाजातून असले तरी ते ‘अच्छेदिन‘ ची चादर पांघरून झोपलेले आहेत. या लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे प्रकल्प कार्यालयातील अधिकारी मुजोर झाले असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने केला आहे.
या दोषी अधिकाऱयांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा जिल्हा काँग्रेस तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करेल, असा इशाराही निवेदनातून शासनाला दिला आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात मुदतबाह्य पाणीपाऊचचे वितरण

0

berartimes.comगोंदिया,दि.6 : शिक्षण विभाग जि.प. प्राथमिकतर्फे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आदर्श शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार कार्यक्रम शिक्षक दिनी न घेता मंगळवारला(दि.६) घेण्यात आला.विशेष म्हणजे सकाळी ११ वाजताचा हा कार्यक्रम शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे तब्बल तीनतास उशीराने २ वाजता सुरु झाला.त्यातही सकाळपासून आलेल्या शिक्षक व विद्यार्थांना दुपारी 3.30 वाजता पुरस्कार देण्यात आले.त्यातच या कार्यक्रमासाठी शिक्षण विभागाच्यावतीने नास्ता,चहा व पाण्याची सोय करण्यात आली होती.परंतु जे पाणी पाऊच या कार्यक्रमाला हजर असलेल्या शिक्षक,विद्यार्थी व इतर मान्यवरांना वितरित करण्यात आले,ते मुदतबाह्य पाणीपाऊच वितरीत करण्यात आल्याचा प्रकार पाणी प्यालानंतर उलटी करुन बेशुध्द पडलेल्या एका विद्यार्थीनीमूळे उघडकीस आला.प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षक दिन कार्यक्रमाला विद्यार्थी,विद्यार्थिनी,शिक्षकांसह पाल्य व निमंत्रित मान्यवर सहभागी झाले होते.आधीच सकाळचा कार्यक्रम‘ म्हणून सकाळी ११ वाजता पोचलेल्यांना दुपारी २ वाजेपर्यत वाट बघावी लागली. साडेचार तास ताटकळत बसावे लागले होते.या दरम्यान पिण्याचे पाण्याचे पाऊच वितरित करण्यात आले.
ते सुध्दा मुदतबाह्य तारखेचे.शासकीय कार्यक्रमात मुदतबाह्य तारखेचे पाणीपाऊच वितरीत होऊन ते पाणी पिल्याने एका विद्यार्थीनीला उलट्या होऊन प्रकृती खालावल्याचा प्रकार घडला.त्या पॅकेटवर २७ मार्च पॅकींग तारखेचा उल्लेख आहे.पॅकींग तारखेनंतर तीन महिनेच हे पाणी पिण्या योग्य असतानाही दुकानातून सर्रास त्याची विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील देव्हाडा येथील
जायमस्वाल इंड्रस्टी येथील शुयर वॉटर नावाने हे पाणी पँकेटबंद करुन विकले जात आहे.विशेष म्हणजे आएसआय मार्क सुध्दा पॅकेटवर वापरले गेले आहे.यावरुन शासकीय कार्यक्रमात खाद्य देतांना कुठलीही तपासणी केली जात नसल्याने एफडीआय विभागाची सुध्दा यानिमित्ताने पोलखोल झाली आहे.

महाराष्ट्राला मत्स्यव्यवसायात अव्वलस्थानी नेण्यासाठी प्रयत्नशील- महादेव जानकर

0

‘केज कल्चर प्रणाली’तून रोजगाराच्या मुबलक संधी

मुंबई, दि. ६ : पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनाच्या (केज
कल्चर प्रणाली) माध्यमातून सुमारे एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार
आहेत. त्या माध्यमातून महाराष्ट्राला मत्स्यव्यवसायात अव्वलस्थानी
नेण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय
विकास व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज केले.

तारापोरवाला मत्स्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. जानकर
बोलत होते. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विभागाचे सचिव विजय कुमार,
मत्स्यविकास आयुक्त मधुकर गायकवाड, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे
कार्यकारी संचालक अरुण शिंदे उपस्थित होते.

श्री. जानकर म्हणाले की, केज कल्चरच्या माध्यमातून
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रमुख उद्देश असून त्या माध्यमातून
रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील. देशात आंध्र प्रदेश
मत्स्यव्यवसायात अव्वल स्थानावर असून महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे.
येत्या काळात महाराष्ट्राला देशात मत्स्यव्यवसायात अव्वल क्रमांकावर
आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री. जानकर यांनी यावेळी
सांगितले.

‘केज कल्चर’ प्रणाली छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमध्ये
यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही ही योजना
राबविण्यात येणार आहे. आदिवासी असलेला कातकरी समाज हा मत्स्यव्यवसायात
असून मत्स्यव्यवसायाच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान
उंचावण्यात येणार असल्याचे श्री. जानकर यांनी यावेळी सांगितले.

श्री. खोतकर यावेळी म्हणाले की, मत्स्यव्यवसाय धोरण व कार्यप्रणाली
आखण्यात आली आहे. गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादन १.५ मेट्रिक टन असून
येत्या एका वर्षात ते दुपटीने वाढवून ३ मेट्रिक टनांपर्यंत नेण्याचे
उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे श्री. खोतकर यांनी सांगितले.

अज्ञात ट्रकची दुचाकीस धडक, तीन ठार

0

मूर्तिजापूर, दि. 6 – भरधाव वाहनाने दुचाकीस जबर धडक दिल्याने तीन जण जागीच ठार झाले. ही घटना हातगाव येथून जवळच असलेल्या सोनोरी पुलाजवळ ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली.

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बु. पोलीस स्टेशन माना येथील रहिवासी प्रकाश शालीकराम राऊत (४२), देवेंद्र हरिश्चंद्र सरदार (४२) आणि ११ वर्षीय सानिका देवेंद्र सरदार हे तिघे अकोल्यावरून दुचाकी क्रए एम.एच. ३० एएस ३७७९ ने आपल्या गावाकडे जामठी बु. येथे येत होते.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील सोनोरी गावानजीक असलेल्या पुलावर खड्डा वाचविण्याचे प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये बापलेकासह प्रकाश राऊत यांचा जागीच मृत्यू झाला.

धुळ्याचे डॉ. रवी वानखेडकर “आयएमए’चे राष्ट्रीय अध्यक्ष

0

berartimes.com धुळे, दि.6:- देशभरातील तीन लाख डॉक्‍टर आणि दोन हजार शाखांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या “आयएमए‘ या वैद्यकीय संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी येथील डॉ. रवी वानखेडकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या रूपाने राज्याला दुसऱ्यांदा, तर धुळ्यासह खानदेशला प्रथमच हा बहुमान मिळाला.डॉ. वानखेडकर 2016- 2017 या कालावधीत “आयएमए‘चे “नॅशनल प्रेसिडेंट इलेक्‍ट‘ म्हणून आणि 2017-2018 या वर्षासाठी “नॅशनल प्रेसिडेंट‘ म्हणून जबाबदारी सांभाळतील. वैद्यकीय आणि सामाजिक कार्यात अग्रेसर, तसेच उपक्रमशीलतेमुळे डॉ. वानखेडकर यांनी कार्यात वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. वैद्यकीय विश्‍वातील श्रेष्ठ अशा “आयएमए‘च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ते विराजमान झाल्याने ती त्यांच्या यशाची पावती मानली जाते.