दारूच्या बिलावरून बारमालकावर प्राणघातक हल्ला

0
20

भंडारा-दारू पिल्यानंतर बिल देण्याच्या कारणावरून तरुणांनी बिअर बारचे कर्मचारी आणि मालकासोबत वाद करत चाकुने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कर्मचारी आणि मालकाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.अंकीत हडपे, जानू कटकवार, अनूप, रोहित सोनेकर सर्व रा. टप्पा मोहल्ला, कस्तुरबा गांधी वॉर्ड, भंडारा व शनी सुभाष रनभूत रा. ग्रामसेवक कॉलनी भंडारा अशी आरोपींची नावे आहेत.
भंडाराजवळच्या खोकरला गावात राज बार अँन्ड रेस्टॉरेंट आहे. ३0 जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास सदर युवक हे बारमध्ये आले. बार बंद करण्याची वेळ झाल्याने बारचा कर्मचारी सचिन माटे याने आरोपींना बिल देऊन घरी जा, असे म्हणाला असता आरोपींनी ‘तू हम लोगों को पैसे मांगता है क्या?’ असे बोलले. त्यातील एकाने काउंटरजवळ जाऊन चाकुने सचिन माटे याच्यावर वार केला. तो वार त्याने चुकविला. त्यानंतर सचिनने तात्काळ बारमालक आयूष सार्वे याला फोन करून बोलविले. बारमालकांनी आरोपींना बिलाचे पैसे द्या व जा असे म्हटले असता आरोपींनी त्यांच्याशीही वाद घालायला सुरुवात केली.
तेवढय़ात आरोपींपैकी एकाने बारमालक आयूष सार्वे यांना पाठीमागून येऊन मारहाण केली. त्यांना विटाच्या तुकड्याने मारले. बारमालकांसोबत भांडण सुरू असल्याने सचिन माटे याने मध्यस्थी केली असता एकाने सचिनच्या भावाला पाईपने मारले. तसेच संजय वाशिमकर यालाही मारहाण केली. त्यानंतर सर्व मुले पांढर्‍या रंगाच्या रुग्णवाहिकेने व एका दुचाकीवर बसून पसार झाले.
या घटनेची फिर्याद सचिन माटे याने भंडारा पोलिसात केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३0७, १४३, १४७, १४८ भादंविनुसार गुन्हा नोंदवून अटक केली आहे. तपास पोलिस हवालदार विपीन लांजेवार करीत आहेत.