बाल लैंगिक अत्याचार्‍याला तीन वर्षाचा कारावास

0
18

गोंदिया ,-जिल्हा तथा जिल्हा विशेष न्यायाधीश एन.बी.लवटे यांनी 16 फेब्रुवारी रोजी बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला 3 वर्षाचा सश्रम कारावास व दंडात्मक शिक्षा ठोठावली.रोशन गजभिये (40, रा.गोंदिया ) असे आरोपीचे नाव आहे.पीडित 12 वर्षीय मुलगी ही तिच्या नातेवाईकाच्या घरी 22 मे 2018 रोजी एकटी खेळत असताना आरोपीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याचवेळी पीडितेची आई पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.या संदर्भात शहर पोलिसांनी आरोपीवर भादंवि 354 व कलम 8 बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमातंर्गत गुन्हा नोंदविला.दरम्यान तत्कालीन तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मारोती दासरे यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी सात साक्षदार मांडले.सरकारी वकील व आरोपीच्या वकीलाच्या युक्तीवादानंतर रोशन गजभिये हा दोषी आढळल्याने न्या.लवटे यांनी रोशन गजभिये याला तीन वर्षाचा सश्रम कारावास व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याचा कारावास तसेच कलम 12 अंतर्गत 2 वर्षाचा सश्रम कारावास व 500 रुपयांचा दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या देखरेखीत पैरवी पोलिस शिपाई टोमेश्वरी पटले यांनी काम पाहिले.