जिल्ह्यात फोफावले अवैध धंदे, मटका सुरू; पोलिसांचे दुर्लक्ष..!

0
75

गोंदिया,दि.05ः-अवैध धंद्यांत सहभागी असलेल्या काही व्यक्तींना पोलिसांनी हद्दपार केले असले तरी मटका व इतर अवैध धंदे मात्र जिल्ह्याच्या विविध भागांत बिनदिक्कत सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. यावर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे यानिमित्त आढळून आले आहे. पोलीस अधीक्षक सुवेझ हक,चंद्रकिशोर मीणा यांच्या काळातील बंद अवैध धंदे सध्या सर्रास सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.विशेष म्हणजे काही पोलीस कर्मचारी तर या अवैधधंद्याच्या वसुलीसाठीच गोंदिया-आमगाव-गोंदिया-अर्जुनी मोरगाव फेर्या मारत असल्याची चर्चा असून पगाराच्या तुलनेत या पोलीस कर्मचार्यांचे घर बघितल्यास ईडीलाही विचार करण्याची वेळ येऊ शकते.विशेष म्हणजे क्रिकेटचे बुकी सुध्दा गोंदियात असून लोकांच्या चर्चेनुसार यामध्ये मोबाईलचे काही कंपन्याचे दुकान थाटून बसलेल्या तथाकथीत काही मोजक्या लोकांनी क्रिकेटच्या सट्यात काम सुरु केल्याची चर्चा असून त्या दुकानधारकाचे पोलीस अधिकारी,कर्मचारी,राजकीय नेत्यासंह पत्रकारांशीही चांगले संबध असल्याने कुणीही त्याबद्दल बोलत नसल्याची चर्चा आहे.
अधिक पैशांचे आमिष दाखवून गोरगरीब जनतेला लुटण्याचा धंदाच शहरासह जिल्ह्यात जोमात सुरु आहे. शहरातील बसस्थानक,प्रभात टाॅकीज परिसर,चांदणी चौक,मरारटोली,उड्डाणपुलाखाली,सुर्याटोला,तिरोड्यात जुन्या नगरपरिषदेच्या मागे,इसापूर,पालचौक,रेलटोली स्टेशन परिसर,कोहमारा,सौंदड,चिचगड,ठाणा,रावणवाडी,काटी,दवनीवाडा,मुर्री,छोटा गोंदिया,कंटगी,नागरा,कुडवा या प्रमुख गावांसह छोट्या छोट्या गावांमध्ये मटका सुरु असल्याचे आढळून येत आहे. विशेष म्हणजे मटका घेणा-या बुकींना पोलिसांनी हद्दपार केले असले तरी त्यांचे नेटवर्क अजूनही सुरुच असल्याचे दिसते. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असून, आजी माजी नगरसेवक व काही राजकारण्यांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. तर एक नेता तर या सर्वांचे काळे पैसे आपल्या एका पतसंस्थेच्या माध्यमातून पांढरे करीत असल्याचे बोलले जात असून नोटबंदीच्या काळात त्या पतसंस्थेची मोठी उलाढाल झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अवैध धंदे करणा-यांना राजकीय क्षेत्रासोबतच रक्षणकर्त्यांकडूनच पाठबळ असल्याचेही बोलले जाते. मात्र, सध्या आॅनलाईन लॉटरी, क्रिकेट मॅचवरील बेटिंग व मटका इ. अवैध धंदे फोफावले असून, याविरुद्ध कडक मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे.
शहरात मटका चालविणा-याविरुद्ध हद्दपारीच्या कारवाईची प्रकियाच गोंदियात झालेली नाही.शहरातील विविध भागांत करमणूक केंद्राच्या नावाखाली अवैध आॅनलाईनचा लॉटरी व्यवसाय सर्रास सुरु असून, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी अशा प्रकारच्या जुगाराच्या आहारी जात असल्याचे उघडकीस आले असून पोलीस निव्वळ देखाव्याच्या नावावर कारवाई करीत असल्याने यांच्यावर वचक राहिलेला नाही.