शिक्षेच्या भीतीने चिमुकलीसह पित्याची आत्महत्याच;मुर्री येथील घटना

0
6
गोंदिया,दि.२०ः-:  स्थानिक श्रीनगर मुर्री चौकी येथील योगेश देवराव वंजारी याच्या पत्नीचा विष प्राशन केल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी आत्महत्येस कारणीभूतच्या आरोपाखाली गोंदिया शहर पोलिस ठाण्यात योगेश वंजारीविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना उद्या (ता.२१) सुनावणी होती. सुनावणीदरम्यान आपण शिक्षेस पात्र ठरणार, या भीतीपोटी काल (ता.१९) रात्री ३ वर्षीय चिमुकलीला विष पाजून योगेशने देखील आत्महत्या केली. ही घटना आज (ता.२०) सकाळी दोन्ही बापलेक झोपेतून जागे झाले नसल्याने उघडकीस आली. योगेश देवराव वंजारी (३२), अलीन्न्या योगेश वंजारी (साडे तीन वर्ष) असे विष प्राशनाने मृत्यू झालेल्या बापलेकीचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.
मुर्री चौक येथे राहणार्‍या योगेशच्या पत्नीने मार्च २०१८ मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या आत्महत्येला योगेश जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला व त्याच्यावर गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. तत्पूर्वी योगेश व त्याची मुलगी अलीन्न्या हे सोबत राहायचे. न्यायालयाचे निर्णय अंगलट येण्याची शक्यता योगेशला झाली असावी व याच विवंचनेत त्याने १९ नोव्हेंबरच्या रात्रदरम्यान अलीन्न्याला विष पाजून स्वत:ही प्राशन केले. आज (ता.२०) सकाळी योगेश व अलीन्न्याला उठविण्यासाठी कुटुंबातील काही व्यक्ती गेले असता, ते अत्यवस्थेत आढळले. दोघांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले. वैद्यकीय परीक्षणावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे तसेच तपासणीअंती अलीन्न्याच्या मृत्यूला मृतक योगेश जबाबदार असल्याचे धरून त्याच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल केला आहे. या घटनेने मुर्री चौक परिसरात खळबळ उडाली आहे.