5 नक्षलवाद्यांचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

0
20
गडचिरोली,दि.31ः- 27 लाख रुपये बक्षीस असलेल्या एकूण पाच नक्षलवाद्यांनी सोमवारला(दि.29) गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिला माओवाद्यांचा समावेश आहे पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आत्मसमर्पण केलेल्या पाच माजी नक्षलवाद्यांचा पुष्पगुच्छ आणि दुपट्टा देऊन सत्कार केला व मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.आत्मसमर्पितांमध्ये अजय ऊर्फ मनेसिंग फागूराम कुडियामी या प्लाटून क्रमांक तीनच्या उपकमांडरचा समावेश आहे. त्याचे वर चकमकीत एकोणवीस गुन्हे व खुनाचे 12 गुन्हे जाळपोळीचे पाच गुन्हे दाखल असून, एकूण पाच लाख 50 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर होते.

राजो उर्फ गंगा उर्फ शशिकला सोमजी तुलावी या 26 वर्षाच्या महिला माओवादी हिने आत्मसमर्पण केले असून ती प्लाटून क्रमांक 3 मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे आठ, खुनाचे दोन, जाळपोळीचे दोन असे एकूण बारा गुन्हे दाखल असून शासनाने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.सपना उर्फ रुखमा दोनु वड्डे या प्लाटून पदाच्या सदस्य असलेल्या महिला नक्षलीने आत्मसमर्पण केले असून तिच्यावर चकमकीचे बारा खुनाचे चार व जाळपोळीचे चार गुन्हे दाखल आहेत. तिच्यावरही पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

गुन्नी ऊर्फ बेहरी ऊर्फ वासंती मनकेर मडावी या 31 वर्षीय महिला नक्षलवादी हिने आज आत्मसमर्पण केले असुन ती वर्तमान स्थितीत प्लाटून क्रमांक 10 ची सदस्य होती . तिचे वर पाच लाख 75 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.कंपनी क्रमांक 10 चा सदस्य असलेला सुनील ऊर्फ फुलसिंग सुजान होळी या अडतीस वर्षाच्या नक्षल्याने आज एस पी समोर आत्मसमर्पण केले असून त्याच्यावर सुद्धा पाच लाख 75 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सुनील जुलै 2008 मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य म्हणून भरती झाला होता.

नक्षली दलांमध्ये जवळजवळ एक तप कार्य केल्यानंतर ज्यांचा हिरमोड झाला त्यांनी नक्षलवादाला तिलांजली देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी यावेळी सांगितले. या वर्षभरात एकूण एक कोटी एंशी लाखाचे बक्षीस असलेल्या 34 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आत्मसमर्पितांमध्ये 3 डीव्हीसी,2 दलम कमांडर, 2 दलम उपकमांडर, 26 दलम सदस्य व एका जनमिलिशियाचा समावेश आहे. पोलीस दलाच्या प्रभावी कामगिरीमुळेच वर्षभरात एवढे मोठे यश प्राप्त झाल्याचा दावा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केला आहे

Share