धानोरा येथील नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

0
207

गडचिरोली,ता.3: कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदीच्या कामाकरिता सालवंसी तयार करुन देण्याचा मोबदला म्हणून एका व्यक्तीकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना  धानोरा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार दीपक शिवचरण भैसारे (५६) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.

तक्रारकर्ता हा धानोरा येथील रहिवासी असून, तो कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य खरेदी-विक्रीचे काम करतो. त्यासाठी त्याला सालवंसीची गरज होती. ती प्राप्त करण्यासाठी त्याने तहसील कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. परंतु सालवंसी तयार करुन देण्यासाठी नायब तहसीलदार दीपक भैसारे याने तक्रारकर्त्यास १ हजार रुपयांची मागणी केली. परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज दुपारी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी नायब तहसीलदार दीपक भैसारे यास तक्रारकर्त्याकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (संशोधन २०१९)  नुसार धानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार, पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू  धोटे, शिपाई सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, महेश कुकुडकार, घनश्याम वडेट्टीवार, सोनल आत्राम, सोनी तावाडे यांनी ही कारवाई केली.