वन्यजीव सप्ताह निबंध व चित्रकला स्पर्धा

0
278

गोंदिया,दि.२९ : नव्या पिढीस निसर्ग आणि वन्यजीवांबाबत आस्था निर्माण व्हावी तसेच त्यांच्या अभिव्यक्तीस वाव देण्यासाठी आणि त्यामाध्यमातून जागृती निर्माण करण्यासाठी १ ते ७ ऑक्टोंबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून वनविभागाच्या वतीने विविध स्तरावर निबंध, चित्रकला व छायाचित्र स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
निबंध स्पर्धा- महाविद्यालयीन गट/मुक्त गटासाठी वातावरण बदल/ग्लोबल वॉर्मीगमुळे वन आणि वन्य प्राण्यांवर होणारे परिणाम या विषयावर, इयत्ता ११ वी व १२ वीच्या कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी समुद्र किनारपट्टी, परिस्थितीकीमध्ये कांदळवनाचे महत्व हा विषय असून इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी वन्यप्राण्यांपासून घ्यावयाची अनुकरणीय जीवनशैली, इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी जल, वायू व ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी मी काय करु शकतो हे विषय आहेत.
चित्रकला स्पर्धा- चित्रकला विद्यालयीन विद्यार्थी/चित्रकला महाविद्यालयीन विद्यार्थी/मुक्तगट यांचेसाठी घोषवाक्यासह राज्यस्तरावर भित्तीचित्र स्पर्धा असून ही स्वच्छ भारत स्वच्छ पर्यावरण या विषयावर, सर्वसाधारण महाविद्यालयीन व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी यांचेसाठी घोषवाक्यासह भित्तीचित्र स्पर्धा ही झाड एक – उपयोग अनेक या विषयावर, माध्यमिक विद्यालयीन विद्यार्थी इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी नैसर्गिक अधिवासातील स्वच्छंद वन्यप्राणी या विषयावर आणि इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पानस्थळ क्षेत्र व तेथील वन्यजीवन या विषयावर तर पहिली ते चवथीच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पक्षांचे घरटे हा विषय चित्रकला स्पर्धेसाठी आहे.
छायाचित्र स्पर्धा- राज्यातील हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारासाठी मुक्त गटातून स्थलांतर करणारे पक्षी या विषयावर, महाविद्यालयीन/शालेय गटासाठी कोळी किटक हा विषय तर वन विभागातील क्षेत्रीय कर्मचारी/अधिकारी या ब,क,ड गटाकरीता वन्यप्राण्यांचे निसर्गातील एक छायाचित्र या विषयावर छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या तिनही स्पर्धा नि:शुल्क आहे. शासकीय व महाविद्यालयीन गटांनी शिक्षण प्रमुखामार्फत वनपरिक्षेत्र अधिकारी किंवा उपवनसंरक्षक गोंदिया यांचेकडे प्रवेशिका १५ सप्टेंबर पुर्वी पाठवाव्या. चित्रकला स्पर्धेतील मुक्त गटांच्या स्पर्धकांनी त्यांचे भित्तीचित्र व छायाचित्र स्पर्धेतील स्पर्धकांनी छायाचित्र प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), वन भवन, रामगिरी रोड, सिव्हील लाईन,नागपूर या पत्त्यावर १५ सप्टेंबर पर्यंतच पाठवावी.
स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येईल. मोठ्या संख्येने नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन गोंदियाचे उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.