१६ जिल्ह्यांमध्ये आदिवासी मुलांना मातृभाषेतून शिक्षण !

0
15
  • खेमेंद्र कटरे
  • गोंदिया,दि. १२ –  : राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांतील १० बोली भाषा लिपिबद्ध करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले असून, आदिवासी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी शिक्षक बोली भाषेचे धडे गिरविणार आहेत. बोली भाषांमधील शब्दकोषही तयार केला जाणार आहे.

    राज्यातील ३६ जिल्ह्यांतील १६ जिल्ह्यांमध्ये आदिवासी बोलीभाषा बोलल्या जातात. त्यात ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, पुणे, अहमदनगर, नांदेड, रायगड जिल्ह्यांचा समावेश आहे.आदिवासी जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात. मात्र सध्या बोली भाषेतील १० पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत.

    आदिवासी बोली भाषेतील वाक्यांचे भाषांतर देवनागरीत करून ‘खेळच खेळ’ आणि ‘ओढ्याकाठी’ या दोन पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांतील दरी कमी करण्यासाठी हे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे आदिवासी भागातील शिक्षकांना या पुस्तकांतील धडे गिरवावे लागणार आहेत.

    आदिवासी भागातील पहिली व दुसरीच्या वर्गातील मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यास त्यांची आकलनशक्ती वाढीस लागेल. परिणामी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती कमी होईल, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने १० आदिवासी बोली भाषेतील संवाद पुस्तिका तयार केल्या आहेत. वारली, पावरी, भिलोरी, कातकरी, नहाली, गोंडी, कोलामी, परधान, कोरकू आणि मावची बोली भाषांमध्ये बोलल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या वाक्यांचा समावेश ‘खेळच खेळ’ आणि ‘ओढ्याकाठी’ या दोन पुस्तिकांमध्ये करण्यात आला आहे. बोली भाषेतील वाक्यांसमोर देवनागरी भाषेतील वाक्ये असतील. त्यामुळे बोली भाषेतील कोणत्या वाक्याचा अर्थ काय, हे शिक्षक व विद्यार्थ्यांना समजू शकेल.