महाज्योतीचे अध्यक्ष व मंत्री आणि एमडी करताहेत ओबीसी विद्यार्थ्यांची पिळवणूक

0
115

तब्बल सहाशे विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीकरीता बोलावुन,एैन वेळेवर केली पडताळणी रद्द!
कोल्हापुर, मुंबई, पुणे चे विद्यार्थ्यांना रेल्वेत असतांनाच मिळाली रद्दची सुचना!

संचालक प्रा.गमे व वडलेंनी व्यक्त केली नाराजी!

गोंदिया,दि.24ः- पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप कशा पध्दतीने दिली जाईल, त्यांच्या निवडीचे निकष काय, हे सुध्दा संचालक मंडळासमोर ठेवले नाहीत. आणि संचालक मंडळाला अंधारात ठेवून,महाज्योतीकडे फेलोशिपसाठी अर्ज करणार्‍या महाराष्ट्रातील कोकण,कोल्हापुर,पुणे मुंबई येथपासुनच्या सहाशे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना,२४ आॅगस्ट, २५ आॅगस्ट व २६ आॅगस्टला कागदपत्र पडताळणीकरीता नागपूर येथील महाज्योती कार्यालयात प्रत्यक्ष बोलाविले. त्यातही महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालक प्रदिप डांगे यांनी २०२०—२१ चे म्हणजे १५ जुलै २०२१ पर्यंत विद्यापीठ नोंदणी झालेले, व विद्यापीठात रितसर पुर्णवेळ संशोधन करणारे विद्यार्थी पात्र असतांना,संचालक मंडळाचा व जाहीरातीमधील अटींचा भंग करून, त्या यादीतुनच बाहेर काढल्याने ओबीसी विद्यार्थ्यांबाबत गोंधळ निर्माण झाल्याची टिका संचालक प्रा.दिवाकर गमे व लक्ष्मण वडले यांनी केला आहे.
त्यातच हे सर्व विद्यार्थी २४ आॅगस्टच्या कागदपडताळणीकरीता नागपूरला येण्यासाठी कुणी रेल्वेत तर कुणी बसने निघालेले होते.कुणी पैसे उधार घेवून रेल्वे बसचे आरक्षण केले होते, अशा विद्यार्थ्यांना कुठलेही कारण न सांगता अगदी हुकुमशाही पध्दतीने २३ आॅगस्टला सायंकाळी चार वाजता या सर्व कागदपत्रांची पडताळणी मुलाखत रद्द केल्याचे पत्र जाहिर करुन आपल्या हलगर्जीपणाचा कामाचा कळसच महाज्योतीने गाठला आहे. यामुळे प्रवासात असणार्‍या विद्यार्थ्यांना धक्का बसला.पुढे जावे की मागे जावे,हा त्यांना प्रश्र्न पडला. अनेक वर्षानंतर या ओबीसी विद्यार्थ्यांना आता तरी आपल्याला आपल्या हक्काची फेलोशिप मिळेल ही आशा होती, ती अशा पध्दतीने धुळीला मिळाली. या अशा आतयायीपणे वेरिफिकेशन रद्द करण्याची कुठलीही साधी माहीती संचालकांना देण्यात आली नाही. महाज्योतीचे अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे व्यवस्थापकीय संचालक प्रदिप डांगे यांच्या नियोजनशुन्य, बेकायदेशीर आणि ओबीसी विद्यार्थ्यांना बुध्दीपुरस्करपणे त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.त्यातच विद्यार्थ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
या बाबत महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे व लक्ष्मण वडले यांनी , महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकाने जी ओबीसी संशोधक विद्यार्थ्यांची ओबीसी विरोधी धोरणातून परवड लावली,त्यांना वेठबिगार्‍यांसारखी वागणुक दिली,त्याबाबत तिव्र संताप व्यक्त करीत मुख्यमंत्र्यासह ओबीसी उपसमितीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे तक्रार करुन डांगे यांना तत्काळ हटवण्याची मागणी केली आहे.सोबतच महाज्योतीकरीता चांगला पुर्णवेळ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक देण्याचीही मागणी केली आहे.

महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ही ओबीसी भटक्या जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी स्थापन झालेली महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेवर शासनाने तीन अशासकीय तज्ञ संचालकांची ११ आॅगस्ट २०२० ला नेमणुक केली. पण कायद्यात तरतुद असतांना स्वतंत्र अध्यक्षांची नेमणुक करण्याऐवजी, इतर मागास विभागाचे मंत्री यांनी, स्वतंत्र अध्यक्षाची निवड होईपर्यंत या विभागाचे मंत्री अध्यक्ष म्हणुन कार्यभार पाहतील, अशी अट टाकुन, महाज्योतीचे अध्यक्षपद मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वताकडेच ठेवले. पण वर्षभरात सुध्दा महाज्योतीला स्वतंत्र अध्यक्ष नेमण्यासाठी मंत्रीमहोदयांना किंवा त्या विभागाला मुहुर्त मिळालेला नाही.
हीच गत महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांची! पुण्याहुन नागपुरला आणलेल्या या महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी मंत्री महोदयांनी नागपुरपासुन २०० किलोमिटर दुर असलेल्या गोंदिया या जिल्हा परीषदेचे नियमित सीईओ असलेले प्रदिप डांगे यांना अतिरिक्त कार्यभार देवून बसविले. आणि तेथुनच महाज्योतीची आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध कल्याणकारी योजनांची परवड निर्माण झाली.नागपुरात महाज्योतीचा अतिरिक्त कार्यभार देण्यासाठी अनेक सक्षम अधिकारी असतांना, आपल्या गावचा गडचिरोलीतील अधिकारी म्हणुन, अकार्यक्षम प्रदिप डांगे यांना मंत्र्यांनी असा कार्यभार देवुन, महाज्योतीची वाट तर लावलीच, पण पण महाराष्ट्रातील ८ कोटी ओबीसी भटक्याजाती जमाती व विशेष मागास प्रवर्गाची फसवणुक केली अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

मागील एक वर्षापासुन,विविध विद्यापीठांमधे पीएचडी साठी पुर्णवेळ संशोधन करणार्‍या ओबीसी भटक्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना बार्टी आणि सारथी प्रमाणे फेलोशिप देण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. आणि ती महाज्योतीच्या नियमांप्रमाणे देणे आवश्यक होते. पण व्यवस्थापकीय संचालक प्रदिप डांगे यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना या योजनांपासुन डावलण्यासाठी जाहीरातच काढली नाही. तर दुसरीकडे पाच ते सहा महिण्यापासुन त्यावेळी संचालक मंडळाची सभाही बोलाविली नाही. शेवटी विद्यार्थी त्यांना कायदा व शासन निर्णयाप्रमाणे पीएचडी साठी फेलोशिप मिळण्यासाठी आंदोलनावर उतरले. जाहिरात काढली. पण मुद्दाम त्यात एवढ्या त्रुटी आणि चुका ठेवल्या,की पुन्हा विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले. त्यावेळी महाज्योतीच्या तज्ञ संचालकांनी महाज्योतीची संचालक मंडळाची सभा घेवुन, या विद्यार्थ्याला न्याय द्यावा, अशी मंत्री अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांकडे मागणी केली.
तेंव्हा तब्बल ५ महिण्यानंतर दोन वेळा सभेच्या तारखा बदलवून, ३१मे २०२१ ला संचालक मंडळाची सभा घेतली. त्यात संचालकांनी ओबीसी व भटक्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना बार्टी व सारथीप्रमाणे पीएचडी साठी फेलोशिप प्रति महिना ३१ हजार रूपये देण्यात यावी असा निर्णय घेतला. त्यासाठी ५०० विद्यार्थी संख्या ठरविण्यात आली,तसेच १ एप्रिल२०१७ ते जाहीरातीच्या अंतिम दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात कायद्यातील तरतुदीनुसार पीएचडी साठी नोंदणी केलेली आहे, व जे विद्यार्थी विद्यापीठ व महाविद्यालयात पुर्ण वेळ संशोधन करीत आहे, त्यांचे अर्ज मागविण्यात यावे, असा निर्णय घेतला.व तशी जाहीरातही काढली.
हे सर्व झाल्यावर या आता वर्षभरापासुन प्रलंबित असलेला, व जेवढा वेळ लागेल, तेवढे विद्यार्थी फेलोशिपला मुकतील, हे लक्षात घेवून आता तरी या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल,असे संचालकांना वाटले. पुन्हा महिनोंगणती संचालक मंडळाच्या सभा घेण्यास व्यवस्थापकीय संचालकांनी टाळाटाळ चालविली. ९ आॅगस्ट ची संचालक मंडळाची नोटीस काढली, ती वेळेवर रद्द करून १६आॅगस्ट केली. पण या सभेला महाज्योतीचे अध्यक्ष मंत्री तर आलेच नाही, पण व्यवस्थापकीय संचालक प्रदिप डांगे यांनी वैद्यकीय कारण देवून,संचालक मंडळाच्या सभेलाच दांडी मारली. या सभेत आर्थिक ठराव एमडी व अध्यक्ष उपस्थित नसल्यामुळे पारित होवु शकले नाही. पुन्हा ही मिटींग २१ आॅगस्टला घेण्याचे ठरले. नोटीसही निघाला. पण आदल्याच दिवशी पुन्हा ती मिटींग रद्द करून आता २८ आॅगस्टला होईल असा चौथ्यांदा नोटीस निघाला! मिटींग होईपर्यंत पुन्हा काय होते हे माहीत नाही.

तसेच या महाज्योतीच्या गैरव्यवस्थापनाच्या अशा आतयायी पणे मुलाखती ऐन वेळेवर रद्द केल्यामुळे, विद्यार्थ्यांचे जे आर्थिक नुकसान झाले.तसेच त्यांना जो मनस्ताप झाला, त्याबाबत संचालक गमे व वडले यांनी सर्व विद्यार्थ्यांची माफी मागीतली आहे. तसेच अशा ओबीसी विद्यार्थ्यांवर आकसापोटी असे नियोजन शुन्य आणि गैरकारभार करणार्‍या अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक प्रदिप डांगे यांची तत्काळ महाज्योतीमधुन हकालपट्टी करावी, आणि पुन्हा कूठल्याही परिस्थितीत अशा ओबीसी विद्यार्थ्यांचा छळवाद मांडुन, हुकुमशाही पध्दतीने,गैर कारभार करणार्‍या प्रदिप डांगे यांना महाज्योतीमधे घेवु नये, अशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, तसेच मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना निवेदन देवून विनंती करणार असल्याचे, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे व दुसरे संचालक लक्ष्मण वडले यांनी निवेदन करून सांगीतले आहे.