पी. जी. कटरे : स्वप्न बघा..यशप्राप्ती होईल

0
15

अर्जुनी/मोरगाव : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वप्न बघितलीच पाहिजे. बघितलेल्या स्वप्नाप्रमाणे उद्दीष्ट ठरवा. जोपर्यंत स्वप्न बघत नाही तोपर्यंत ते कृतीत येऊ शकत नाही. या मार्गानेच यशस्वी भवितव्य घडते. दृष्टीपेक्षा दृष्टीकोन महत्वाचा आहे. प्रत्येक कार्यात दृष्टीकोन असला पाहिजे, असे मार्गदर्शन गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी केले. ते स्थानिक जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात बोलत होते.
उद््घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष यशवंत परशुरामकर, आदर्श महाविद्यालय वडसाचे प्रा.डॉ. हितेंद्र धोटे, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष राधेश्याम कापगते, जिल्हा परिषद सदस्य गिरीष पालीवाल, नगरसेविका उर्मिला बुगनाके, कक्ष अधिकारी दिवाकर खोब्रागडे, रमेश भाग्यवंत, सिद्धार्थटेंभुर्णे, अँड. राजेश पालीवाल, लालबहादुर चंदेल, पी.डी. बन्सोड, पी.एस.मेश्राम, लंजेश्‍वर बडोले, लोगडे आदी उपस्थित होते.
कटरे पुढे म्हणाले, देश घडविण्यासाठी जी आयुधं लागतात, ती निर्मितीची प्रयोगशाळा म्हणजे शाळा- महाविद्यालये होत. अलीकडच्या कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असल्याची कबुली त्यांनी दिली. मात्र याच शाळांनी राजपत्रित अधिकारी, इंजिनिअर, डॉक्टर, राजकीय नेते, प्राध्यापक घडविले. शिक्षकांना उद्बोधन करताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर कुठलाही परिणाम होईल अशी कृती शिक्षकांनी करु नये. शिक्षकांनी समाजाचा विश्‍वास कायम ठेवण्यासाठी कामे केली पाहिजे. शालेय वेळेत विद्यार्जन केले पाहिजे. येत्या अडीच वर्षात शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल दिसून येतील असे त्यांनी सांगितले.
गहाणे यांनी, विद्यार्थ्यांनी मनाशी ध्येयाची खुणगाठ बांधली पाहिजे. उद्दीष्टपुर्तीकडे वाटचाल करताना आलेल्या संकटांना खचून न जाता धैर्याने तोंड दिले पाहिजे. यशासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याने नक्कीच यश मिळते. मात्र स्पर्धेच्या या युगात शिक्षकांच्या प्रेरणेचे सदैव स्मरण केले पाहिजे. महापुरुषांचे आदर्श जीवनात अंगीकारा असे प्रतिपादन केले. प्राचार्य परशुरामकर यांनी, मानवात दया असावी अशी संस्कृती आहे. मात्र समाजात लोभीवृत्ती वाढली आहे. लोभीवृत्ती ही संस्कृती नव्हे तर विकृती आहे. ही विकृती टाळून संस्कृती टिकवली पाहिजे. स्वत:चे अस्तित्व निर्माण करा. अस्तित्वानेच माणसाची ओळख होते. ज्यात अस्तित्व नाही तो विद्यार्थिच नाही असे प्रतिपादन केले.
ज्या शिक्षणाची खरी गरज आहे तेच शिक्षण घेतले पाहिजे. अंगी असलेल्या गुणांचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय. पुस्तकाला मित्र बनवा, पुस्तकांची बाग घरोघरी फुलली पाहिजे. शिक्षणामुळेच सर्वांगसुंदर जीवन, व्यक्तीमत्व, आदर्श नागरिक घडते. तुम्ही सर्वत्र सुंदर आहात. स्वत:ला कमी लेखू नका. बोललेले शब्द परत येत नाहीत. ते सांभाळून वापरा. प्रत्येक संधीकडे आशेने बघा असे विचार प्रा.डॉ. धोटे यांनी व्यक्त केले.