स्पर्धात्मक युगात यश मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक – मुख्यमंत्री

0
10

नागपूर : स्पर्धात्मक युगात यशश्री खेचून आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. योग्य मार्गदर्शनामुळे दिशा मिळून यश मिळविता येते. यासाठी स्वप्रयत्न आणि आत्मविश्वास बाळगळल्यास यश दूर नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

महर्षी व्यास सभागृह, रेशीमबाग येथे आकार फाऊंडेशन आयोजित पहिले स्पर्धा परीक्षा करिअर व साहित्य संमेलनाला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर, अमरावती जिल्हाधिकारी किरण गित्ते, आकारचे कार्यकारी संचालक राम वाघ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येकच व्यक्तीमध्ये क्षमता असते. परंतू आपल्या क्षमतेवर आपला विश्वास नसतो. यातूनच आपण प्रयत्न करण्याचे सोडून देतो. यामुळे स्पर्धापरीक्षांसाठी आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. यशस्वी लोकांनीही परिस्थितीचे आव्हान स्वीकारुन अपयशाला न घाबरता यश मिळविले आहे. आज आपल्या देशात तरुणांची संख्या सर्वांत जास्त आहे. जगाला मानव संसाधनाची आवश्यकता आहे. ही भारतासाठी खूप मोठी उपलब्धी आहे.

यावेळी किरण गित्ते लिखित ‘स्टेप्स टू बिकम आयएएस’ तसेच इतर स्पर्धा पुस्तकांचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण करण्यात आले. संमेलनाची सुरुवात 19 फेब्रुवारीला ग्रंथ दिडींने करण्यात आली. संमेलनात विद्यार्थ्यांसाठी विविध परिसंवाद, चर्चासत्र, अधिकाऱ्यांचे प्रशासकीय अनुभव, प्रकट मुलाखात आदींचा समावेश आहे.